Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘प्यार ज़िंदगी है’ - भाग २

‘प्यार ज़िंदगी है’ – भाग २

  • पुस्तक परीक्षण: अनिता पाध्ये

अनिता पाध्ये यांचे नवे पुस्तक ‘प्यार ज़िंदगी है’ हे नुकतेच प्रकाशित झाले आहेत. १२ लोकप्रिय हिंदी चित्रपटांचा निर्मितीप्रवास लेखिकेने सादर केला आहे. या पुस्तकात चित्रपटाच्या निर्मितीसोबत अनेक खरेखुरे रोचक किस्से वाचायला मिळतात. सदर पुस्तकातील ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या निर्मितीप्रवासातील हा काही भाग…

हाय! मी ऐश्वर्या राय, ‘खामोशी’मध्ये तुझे काम मला आवडले.’ चित्रपट संपल्यानंतर संजयकडे येत तिने स्वत:ची ओळख करून दिली होती. १९९४ साली ती मिस वर्ल्ड झाली होती. ही घटना आहे १९९६ सालची. ऐश्वर्याशी संजय भंसाळीची पहिली भेट झाली होती, ती आमिर खान-करिश्मा कपूरच्या ‘राजा हिंदुस्थानी’ चित्रपटाच्या ट्रायलच्या वेळी. तिच्या डोळ्यांमध्ये संजयला अनोखं तेज जाणवलं होतं. तिचे डोळे तिच्या सौंदर्याचा महत्त्वाचा पैलू आहे, असंही त्याने त्यावेळी ओळखलं होतं.

तेव्हा रोमियो ज्युलिएटवर आधारित हा चित्रपट बनवण्याचा त्याचा विचार होता; परंतु अपुऱ्या बजेटमुळे त्याला हाही विचार बाजूला ठेवणं भाग पडलं होतं. त्याच काळात एक दिवस संजयला विलेपार्ले येथे राहणाऱ्या राहणारे वयाची साठी पार केलेले गुजराती लेखक प्रताप करवत यांचा फोन आला. ‘हॅलो, मी प्रताप करवत, मला तुम्हाला भेटायचं आहे, मैं आपको मेरी एक किताब देना चाहता हूं’. पण नैराश्य आलेल्या संजयला कुणाशी बोलायची, भेटायची इच्छा नव्हती. दोन महिन्यांनी पुन्हा त्याच्या घरचा फोन वाजला… ‘हॅलो, मी प्रताप करवत, मी फोनवरच तुम्हाला कथा ऐकवतो’.

पलीकडून संजयने काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच प्रताप करवतनी आपल्या कथेची ‘वन लाइन’ ऐकवण्यास सुरुवात केली. कथा इतकी मनोवेधक की संजय देखील चुपचाप ती ऐकत राहिला. कथानक संपताच संजयला आतून वाटलं, या कथेवर खरंच खूप चांगला चित्रपट बनू शकेल. ती अशा एका मुलीची कथा होती, जिचं लग्नापूर्वी एका तरुणावर प्रेम असतं; परंतु घरचा तिच्या प्रेमाला विरोध असल्याकारणाने त्यांनी निवडलेल्या तरुणाशी तिला लग्न करावं लागतं; परंतु ती आपलं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. अशातच एक दिवस तिच्या पतीला तिच्या प्रेमाविषयी कळतं आणि तिचा परित्याग करण्याऐवजी किंवा तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी संसार करण्याऐवजी तो तिला तिच्या प्रियकराला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतो; परंतु पतीच्या गहिऱ्या प्रेमाची, त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आल्याने अखेर ती प्रियकराऐवजी पतीसह जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेते.

पटकथा तयार करताना अनेक नव्या व्यक्तिरेखा समाविष्ट केल्या गेल्या. नायिकेच्या चुलत बहिणीचा प्रियकर व आई-वडिलांनी अन्य तरुणाशी करून दिलेला तिचा विवाह, लग्नापूर्वी तिला घरातून पळून जाण्यासाठी नायिकेने पुढाकार घेणं, तिच्या प्रियकराचा आपल्या मृत वडिलांशी होत असलेला संवाद आदी अनेक गोष्टी नव्याने समाविष्ट करण्यात आल्या.

चित्रपटाचं स्क्रिप्ट बनत असतानाच कलाकारांची निवड सुरू झाली. नायिकेची भूमिका काजोलने करावी, अशी संजयची इच्छा होती. ‘No, I do not want to do your film’ नकार देत काजोलने बोलणं संपवलं. ऐश्वर्या रायचे निळसर गहिरे डोळे, बघणाऱ्याला खिळवून टाकणारं सौंदर्य आणि मिस वर्ल्डचा मिळालेला किताब हे सारं संजयला भावलं होतंच, त्यामुळे या चित्रपटातील नायिकेची भूमिका ऐश्वर्या उत्तमरीत्या निभावेल, असा विश्वास त्याला वाटत होता. ऐश्वर्यानंतर संजयने बॉबी देओलशी संपर्क साधून त्याला कथानक ऐकवलं. ‘मी दोन हिरो असलेल्या चित्रपटामध्ये काम करत नाही, सोलो हिरो असेल, तरच मला काम करण्यात स्वारस्य आहे’. बॉबी म्हणाला.

बॉबीने नकार दिल्यानंतर संजयच्या मनामध्ये कोणत्या नायकाला विचारावं, हा विचार घोळत होता. त्याचदरम्यान एक दिवस सलमान खानशी त्याची भेट झाली. कथा ऐकताच तो काम करायला तयार झाला. नायिकेच्या नवऱ्याच्या भूमिकेसाठी संजयच्या मनामध्ये एकच नाव होतं, ते म्हणजे अजय देवगणचं. अजय देवगणच्या एकूण व्यक्तिमत्त्वामध्येच एक साधेपण आणि प्रगल्भता आहे. त्यामुळे नायिकेच्या सरळ साध्या आणि प्रगल्भ पतीच्या भूमिकेला अजय योग्य न्याय देईल, अशी संजयला मनोमन खात्री वाटत होती. अजयसह काम करण्यास सलमानला काहीच हरकत नव्हती. अशा रितीने चित्रपटमधील तीन व्यक्तिरेखांसाठी कलाकारांची निवड पक्की झाली.

संजय भंसाळीच्या ‘खामोशी-द म्युझिकल’चं सुमधुर संगीत दिलं होतं, जतीन-ललीत या जोडीने. या चित्रपटामधील गाणी खूप गाजली होती; परंतु संजयला नेहमी काही वेगळं करावं, असं वाटत असतं. त्याला संगीताची उत्तम जाण आहे. या चित्रपटातील गाणी कशी असतील याचा पटकथा लेखन करतानाच त्याने विचार केला होता. संगीतकार विशाल भारद्वाज, अनू मलिक, संदेश शांडिल्य आदींशी बोलणं सुरू असतानाच एक दिवस अचानक इस्माईल दरबार संजयला भेटायला आले. दोघेही एकमेकांना आयुष्यात पहिल्यांदाच भेटत होते.

वादक म्हणून अनेक वर्षे काम करणाऱ्या ईस्माइलना संगीतकार बनायचं होतं. पण संधी मिळत नव्हती. चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाला ऐकवण्यासाठी आपला गीतकार मित्र मेहबूबकडून दोन गाणी लिहून व त्याच्या चाली तयार करून त्यांनी ती रेकॉर्ड केली होती. त्यापैकी ‘तडप तडप इस दिल को’ या गाण्याची ऑडियो कॅसेट घेऊन इस्माईल दरबार वर्सोव्याला संजयला भेटायला गेले होते. ‘मी हे एक गाणे रेकॉर्ड केले आहे, तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे’ इति इस्माईल दरबार. तब्बल नऊ वेळा संजय ते गाणे ऐकत राहिला आणि नऊ वेळा रडवेला होत राहिला. त्यानंतर काही दिवसांनी मेहबूबनी लिहिलेले व हार्मोनियमसह रेकॉर्ड केलेले आणखीन एक गाणे इस्माईलनी संजयना ऐकवले. ‘हम दिल दे चुके सनम, तेरे हो गए है हम’… हे गाणे तर संजयला आवडलेच; परंतु आपल्या या नव्या चित्रपटाचे शीर्षक ‘दिल तो हमने दिया सनम’ असे ठेवण्याचा निर्णय पक्का केला.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -