पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी राष्ट्रवादीला राम राम करत बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला आहे. भालकेंच्या बीआरएस प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर येथील कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भालके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत. या दरम्यान सकाळी सरकोली (ता. पंढरपूर) येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके त्यांच्या कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतील.
मागील काही दिवसांपासून भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. भालके यांच्या निर्णयाचे पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादला गेले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही भेट झाली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. स्व. भारत भालकेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने अपेक्षित सहकार्य केले नाही. आर्थिक अडचणीत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे वारंवार जाऊनही फारशी दखल घेतली नसल्याची खंत भालके यांनी हैदराबादकडे जाताना बोलून दाखविली होती.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra