Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनMiracle of Mamma's: ‘मॉम्स’ची जादू

Miracle of Mamma’s: ‘मॉम्स’ची जादू

  • दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

आईच्या हाताच्या जेवणाला जगात तोड नाही. आपण कितीही उत्तम रेसिपी पाहून एखादा पदार्थ बनवा किंवा उत्तमोत्तम हॉटेलमधून मागवा, आईच्या हाताची चवच न्यारी. जेवण साधं असलं तरी त्याला मायेचा तडका असतो. हा मायेचा तडका जेव्हा घराचा उंबरठा ओलांडून बाहेर येतो, तेव्हा आपल्या चवीची जादू चौफेर नेतो. डोंबिवलीतील miracle of mamma’s अर्थात मॉम्सने गेली ४६ वर्षे आपल्या चवीची जादू अशीच दूरवर नेली आहे. याचं श्रेय आहे सरला समेळ यांना.

माहेरी श्रीमंत असलेल्या सरलाकाकूंचे सासर मध्यमवर्गीय. मात्र या मध्यमवर्गीय अशा समेळ कुटुंबात त्या अगदी सहज मिसळून गेल्या. या कुटुंबात अकस्मात उद्भवलेल्या आर्थिक संकटातून घराला सावरण्यासाठी आणि डोंबिवलीतल्या नोकरदार वर्गाला पोटातली भूक पटकन शमवता यावी, यासाठी सरलाकाकूंनी १९७७ साली डोंबिवली पश्चिम स्टेशनला लागून एक वडापाव सेंटर सुरू केलं. काकूंच्या हातची चव, प्रेमळ स्वभाव, नुसतंच व्यवसाय म्हणून नव्हे, तर माणसं जोडण्याची कला आणि अर्थातच स्टेशनजवळ असल्यामुळे या वडापावची प्रसिद्धी लवकरच सर्वदूर पसरली. काहीच वर्षांत वडापावच्या जोडीला इतरही स्नॅक्स पदार्थ ठेवण्यात आले. पुढच्या काही वर्षांतच मॉम्सच्या इतरही शाखा दिमाखात सुरू करण्यात आल्या. ठाण्यात राहून, पहाटे लवकर उठून, लोकल पकडून सरलाकाकू न चुकता काटकसरीने, प्रामाणिकपणे आपला हा छोटेखानी व्यवसाय सांभाळत होत्या.

पुढे व्यवसायाची धुरा त्यांचा मुलगा मंदार समेळ आणि सून सौ. पल्लवी समेळ यांनी हाती घेतली. सौ. पल्लवी यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी डोंबिवली. त्यामुळे त्या पक्क्या डोंबिवलीकर आहेत. पल्लवी समेळ यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्या टेक्सटाइल विषयात संशोधन करण्यासाठी इंग्लंडला गेल्या. शिक्षण, वाचन आणि प्रवास हे तीन त्यांच्या आवडीचे घटक. २७व्या वर्षी त्या एकत्र कुटुंब पद्धतीचं आदर्श उदाहरण असलेल्या समेळ कुटुंबाच्या सून म्हणून अविभाज्य घटक झाल्या. त्यावेळी त्यांना साधा कुकर कसा लावतात, याचे ज्ञानदेखील नव्हते. मात्र सरलाकाकूंनी मायेच्या ममतेने त्यांना पाककला शिकवली. इतकं शिक्षण होऊनही त्या फूड संबंधित दुकान चालवतात, असे टोमणे अनेक वेळा त्यांनी ऐकलेले आहेत; परंतु पल्लवीने घरचा पारंपरिक व्यवसाय स्वीकारला. कारण त्यांना या व्यवसायात घरच्यांनी घेतलेली मेहनत, काबाडकष्ट दिसले. त्यांच्यासाठी हे एक आव्हान होतं. पण दोन्ही मुलांना सांभाळून त्यांनी इतकी वर्षे हा व्यवसाय उत्तम चालविला. पती मंदार यांच्या प्रोत्साहनामुळे व्यवसायाचा डोलारा उभा राहिला.

मॉम्सच्या सगळ्या शाखेचे दैनंदिन काम, व्यवहार, कर्मचाऱ्यांशी रोजचा व्यवहार, आलेल्या ग्राहकांशी संवाद साधणे, सगळ्या कर्मचाऱ्यांना एक नियमितपणा, शिस्त लावणे. एवढंच नव्हे, तर सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे जेणेकरून संपूर्ण कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, व्यवहारज्ञान मिळेल, एकमेकांशी बॉण्डिंग तयार होईल. आपल्याकडे आलेल्या ग्राहकाकडे फक्त ग्राहक म्हणून न पाहता तो इथून तृप्त होऊन गेला पाहिजे आणि माणुसकी जपली पाहिजे ही त्यांच्या सासूची शिकवण पल्लवी स्वतःही पाळतात आणि कर्मचाऱ्यांना देखील सांगतात.

मॉम्सच्या डोंबिवलीत ३ शाखा असून ठाण्यातही एक शाखा सुरू करण्यात आली आहे. मॉमचं वैशिष्ट्य म्हणजे येथील एकसारखी चव. हे पदार्थ तयार करण्यासाठी त्यांनी शेफ ठेवलेला नाही, तर ज्या महिलांना उत्तम स्वयंपाक येतो त्यांनाच त्यांनी सोबत घेतले आहे. या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार देखील दिलेला आहे. डोंबिवलीतील नोकरदार वर्ग, पहाटे लवकर उठून नोकरीवर जाणारा. त्यांच्यासाठी खास मॉम्स पहाटे सहा वाजल्यापासूनच सुरू होतं. झटपट खाता येईल किंवा नेता येईल असा नाश्ता. वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स, चाटचे प्रकार येथे मिळतात. पारंपरिक थालीपीठ, कोथिंबीर वडी, अळूवडी, उपवासाची मिसळ, उपवासाचे वडे तसेच मोदक आदी पदार्थ अगदी सकाळपासून उपलब्ध असतात. थोडक्यात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ते पूर्वपासून पश्चिमेपर्यंत असलेल्या प्रांतातील एक ना अनेक पदार्थांचा इथे आस्वाद घेता येतो. त्यामुळेच आबालवृद्धांचं हे आवडीचं ठिकाण बनलेलं आहे.

२०२० मध्ये आलेल्या कोरोनाने सगळ्यांनाच हादरवून सोडले. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका, तर हॉटेल व्यवसायाला बसला. पण त्यातही न डगमगता आपल्या कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांनी सामाजिक भान ठेवत घरपोच टिफिन सेवा सुरू केली. डोंबिवलीतल्या तीनही शाखांमध्ये स्नॅक्स पदार्थ बनवले जातात. पण ठाण्याच्या मॉम्सच्या शाखेत मात्र जेवणही सर्व्ह केले जाते. आजूबाजूला असलेली कार्यालये लक्षात घेऊन जेवणाचीही उत्तम सोय ठेवण्यात आली आहे.

श्री मंदार व सौ. पल्लवी समेळ या दुसऱ्या पिढीने ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. सरलाकाकूंच्या वेळी येत असलेले ग्राहक अजूनही हक्काने, प्रेमाने मॉम्समध्ये आवर्जून येतात. एका मराठी महिलेने ४६ वर्षांपूर्वी लावलेल्या या व्यवसायरूपी रोपट्याचं पुढच्या पिढीने वटवृक्षात रूपांतर केलं आहे. मंदार व पल्लवी अभिमानाने सांगतात की, “त्यांची आई हीच त्यांच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आणि प्रेरणादायी आहे. देहरूपाने ती आज सोबत नसली तरी आशीर्वाद स्वरूपात कायम सोबत असेल.” (सरलाकाकू यांचे २०१५ या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले). मॉम्सची पहिली ओळख ही गरमागरम, चविष्ट, भन्नाट असा वडापाव तर आहेच. शिवाय सगळ्या पदार्थांची उत्तम चव, सेवा तत्परता, ग्राहकांशी असलेले आपुलकीचे, सौहार्दाचे नाते ही सगळ्यात मोठी शिदोरी म्हणता येईल. मंदार व पल्लवी यांना पर्यटनाची पण खूप आवड आहे. त्यानिमित्ताने विविध भागांतील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करून मॉम्समध्ये त्याचा तडका कसा दिला जाईल, याचेही नवनवीन प्रयोग हे दाम्पत्य करत असतात.

सरलाकाकूंच्या नंतर त्यांच्या स्नुषा सौ. पल्लवी आपल्या पतीच्या साथीने मॉम्सचा प्रपंच सांभाळत आहेत, विस्तारत आहेत. मॉम्सच्या कुटुंबात कर्तृत्ववान महिलांना संधी दिली जात आहे. त्यामुळे पल्लवी समेळ डोंबिवलीतील खाद्यसंस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या खऱ्या अर्थाने ‘लेडी बॉस’ आहेत.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -