-
मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
आचार्य अत्रे हाडाचे शिक्षक होते. मुलांना शिक्षणात गोडी वाटली पाहिजे, हे त्यांचे मत होते. एखादा विषय रंगवून शिकवण्याची खूप सुंदर हातोटी त्यांच्याकडे होती. शाळेत जाताना मुलांनी आनंदी असायला हवे, असे त्यांना वाटायचे. शाळेतले विविधांगी विश्व त्यांच्या लेखनातून अनेक ठिकाणी प्रकट झाले. ‘फुले आणि मुले’ हा त्यांचा असाच एक कथासंग्रह. लहान मुलांच्या मराठीतील पुस्तकांमधील हा मौल्यवान ऐवज आहे.
‘दिनूचे बिल’ ही त्यांची प्रसिद्ध कथा याच संग्रहात आहे. आईने मुलांसाठी केलेल्या कामांचा हिशोब ठेवता येत नाही नि तिने मुलांसाठी केलेल्या कामांचे बिल बनवल्यास ते फेडणे कठीण होईल. अतिशय सोप्या शब्दांत हे मूल्य या कथेतून अधोरेखित झाले आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ ही अशीच एक गोष्ट. एक राजा आजारी पडला, तेव्हा फकिराने त्या राजाला एक उपाय सुचवला. तो म्हणाला, सुखी माणसाचा सदरा जर तुम्हाला घालायला दिला, तर तुम्ही लवकर बरे व्हाल.
राजाला वाटला तितका हा उपाय सोपा नव्हता. जो तो कुठल्या ना कुठल्या काळजीने पोखरला होता. पण खूप शोध घेतल्यावर राजाच्या शिपायांना एक मनुष्य दिसला. त्याला “तू सुखी आहेस का” असे विचारले. तेव्हा त्याचे उत्तर होते की, “माझ्यासारखा सुखी माणूस या जगात नसेल.” प्रधानाला आनंद झाला कारण, सुखी माणसााचा शोध संपला होता आणि त्यानंतर प्रधानाला झालेली जाणीव मात्र अगदी लखलखीत होती कारण, त्या माणसाच्या अंगात सदराच नव्हता.
अधिकाधिक हव्यास ही मानवी प्रवृत्ती आहे. मात्र खरा सुखी तोच ज्याला हव्यास नसतो. ही छोटीशी कथा जो अर्थ प्रकट करते, तो शाश्वत मूल्यदर्शनाकडे नेतो. ‘बनीची दिवाळी’ ही कथा देण्यातला अपार आनंद व्यक्त करते. दारात येणारा वासुदेव गावी जाऊन आपल्या लेकीसोबत आनंद साजरा करू शकत नाही कारण, त्याच्याकडे प्रवासाला पैसे नाहीत. हे जेव्हा बनीला कळते, तेव्हा ती फटाके फुलबाजे यांचा खर्च वाचवून तेच पैसे वासुदेवाला देते. तो समाधानाने भरून पावतो आणि तिला जाणवते ही दीपावली तिच्याकरिता सर्वोच्च आनंदाची आहे.
‘ठोकळ्याचे चित्र’ ही त्यांची गोष्ट शिक्षकांकरिता आदर्श संदेश देणारी आहे. कला मारून मुटकून शिकवता येत नाही. मुलांची भावावस्था व तद्रुपता त्याकरिता मोलाची असते. ठोकळ्याचे चित्र काढण्याचा हुकूम देणाऱ्या कला शिक्षकास दत्तूचे कलासक्त मन कळत नाही. ते त्याने काढलेले सुंदर निसर्गचित्र फाडून टाकतात. टोपलीतले फाडून फेकलेले कागदाचे कपटे गोळा करत रडणारा दत्तू अस्वस्थ करतो. वर्गाच्या चार भिंतीत जखडून टाकणारे शिक्षण मुलांना काय घडवणार? वर्गात अतिशय उदास वातावरणात मुले कविता शिकतात. कधी शिक्षकांची रुक्षता त्यांना मारून टाकते, तर कधी उजाड रंग उडालेल्या भिंती त्यांना आणखीनच उदास करतात.
‘प्राण्यांवर दया करा’ हा धडा मुलाला वाचायला लावणारे बाबा प्रत्यक्षात कुत्र्याच्या पिल्लाचा जीव वाचवणाऱ्या मुलाला त्याकरिता ओरडत राहतात, मग ही मुक्या प्राण्यांवरची दया केवळ पुस्तकापुरतीच ठेवायची का? मुलांचा गोंधळ उडतो, तो कोरड्या मूल्यशिक्षणाने! वाढत्या वयानुसार मुलांची मने निबर बनतात. निरागस मुलांच्या कोवळ्या मनातील भावना मात्र या सर्वात गुदमरतात. कधी मुलांच्या चिकित्सक प्रश्नांचा गळा कापला जातो, तर कधी त्यांची जिज्ञासू मने चुरगळून जातात.
अवघ्या ४४ पानांचे हे पुस्तक केवढा तरी मोठा पाठ शिकवते. मराठीची गोडी मुलांना लावायची, तर अशा गोष्टी याकरिता साधन ठरतात. पालक म्हणून नि शिक्षक म्हणून ही जबाबदारी आपण किती निभावतो, हे तपासून पाहायला हवे.