Friday, May 9, 2025

कोलाजसाप्ताहिक

Realisation : हवा आतली आणि बाहेरची!

Realisation : हवा आतली आणि बाहेरची!

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


इतक्या वर्षाच्या आयुष्यातील प्रवासात इतकी माणसे भेटली, इतकी ठिकाणे पाहून झाली, इतकी पुस्तके वाचून झाली... किती साठलेपण आहे मनात.


एकदा आणि संध्याकाळच्या वेळी मुलीला घेऊन एका बागेत गेलो होतो. ती थोडा वेळ झोपाळ्यावर खेळ आणि थोडावेळ घसरगुंडीवर खेळली. दमून बेंचवर माझ्या बाजूला येऊन बसली. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होते. इतक्यात समोर एक फुगेवाला येऊन उभा राहिला. विविध आकारांचे, विविध रंगांचे फुले बघून मुलगी आनंदाने चित्कारली, ‘आई ... फुगा!’ मी बेंचवरून उठून फुगेवाल्याकडे गेले. त्याच्यामागे त्यांनी एक बोर्ड लिहून ठेवलेला होता. संध्याकाळची वेळ होती आणि बारीक अक्षरात काहीतरी लिहिलेलं होते ते मी वाचू लागले -
‘तुमच्या बाहेर आहे ते नाही, तर तुमच्या आत आहे जे तुम्हाला उंच घेऊन जाते!’
तोच मजकूर इंग्रजी आणि हिंदीतही लिहिलेला होता.



मी आश्चर्यचकित झाले. इतके दिवस छोटीशी गोष्ट माझ्या का लक्षात आली नाही? बाहेरही हवा आहे आणि फुग्याच्या आतही हवा आहे. पण फुगा हवा न भरता मोकळ्या हवेत नुसताच जमिनीवर ठेवला तर तो आकाशात उडू शकत नाही, तर त्याच्या आत जेव्हा आपण हवा भरतो तेव्हा तो आकाशात उडू लागतो.



माणसांचंही तेच आहे. आपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात. त्याविषयी सखोल ज्ञान मात्र असतेच असे नाही, पण ते नक्कीच मिळवता येते. पण जोपर्यंत ते आपणच एखादी गोष्ट करायची ठरवली, तर निश्चितपणे आपल्याला योग्य दिशा सापडते. त्या गोष्टीसाठी आपल्याला वेळही मिळतो आणि आनंदही मिळतो. आपल्याला आनंद मिळाला की स्वाभाविकपणे आपण तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्नही करतो आणि कदाचित दुसराही आपल्या आनंदाने आनंदित होतो.



अगदी गंमत म्हणून मला एक उदाहरण द्यायला आवडेल. ‘प्रहार’चे संपादक मा. सुकृत खांडेकर यांनी मला प्रहारच्या ‘कोलाज पुरवणी’साठी लेख लिहिण्यास सांगितले. सवयीप्रमाणे मी तत्पर नकार दिला. नकारासाठी माझ्याकडे अनेक कारणे होती- ‘दर रविवारी नवीन विषय कुठून आणायचा?’, ‘एकदा लिहायला घेतलं की, त्याच त्याच विषयावर लिहिले जाते’, ‘सहल, घरगुती कार्यक्रम, साहित्यिक-सांस्कृतिक - सामाजिक कार्यक्रम यातून लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही...’ इत्यादी. ते म्हणाले, ‘प्रयत्न तर करून पाहा जमेल.’



आता वर्षभर मी ‘प्रतिभारंग’ हे सदर चालवत आहे आणि लक्षात आले की, इतक्या वर्षाच्या आयुष्यातील प्रवासात इतकी माणसे भेटली, इतकी ठिकाणे पाहून झाली, इतकी पुस्तके वाचून झाली... किती साठलेपण आहे मनात. फक्त कोणताही विषय मनात आला की, त्यावर किती लिहिता येतेय आपल्याला... इतके की त्याला अंतच नाही.



मला वाटते प्रत्येक माणसाकडे खूप काही असते फक्त त्याला त्याची जाणीव करून देण्याची आवश्यकता असते.



‘आई मला लाल पण हवा आणि पिवळा पण...’
मुलगी म्हणाली आणि विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. लाल... पिवळा... किती विविध रंगाचं, छटांचं, विचारांचं, प्रकारचं ज्ञान सभोवती आहे... परंतु आपल्या आत नेमकं काय आहे? त्यावरच आपली झेप अवलंबून राहणार आहे! एका हातात लाल आणि एका हातात पिवळा फुगा घेतलेली माझी मुलगी फुग्याकडे बाहेरून पाहत होती आणि त्याक्षणी मी फुग्याच्या आत जाऊन उंच उंच उडत होते!



[email protected]

Comments
Add Comment