
मॉस्को: युक्रेनसोबत (Ukraine) वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता रशियातच (Russia) सत्तापालट होण्याची चिन्हे आहेत. रशियाचे खासगी सैन्य वॅगनर आर्मीने (Wagner Army) सरकारविरोधात उठाव करत रोस्तोव शहरावर कब्जा केला आहे. रशियाला लवकरच नवा राष्ट्रपती मिळेल असा दावा वॅगनरने केला आहे. त्यामुळे आता रशियातील पुतिन (Putin) युग संपेल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
वॅगनर ग्रुपने त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून ही घोषणा केली आहे. पुतिन यांनी चुकीचा पर्याय निवडला असून रशियाला लवकरच नवा राष्ट्रपती मिळेल अशी घोषणा वॅगनरने केली आहे. यात आपलाच विजय होईल असेही वॅगनरने म्हटले आहे. एक किंवा दोन गद्दारांच्या जीवाला २५ हजार सैनिकांच्या जीवापेक्षा जास्त महत्व देण्यात आले आहे. रशियात अधिकृतपणे गृहयुद्ध सुरू झाले आहे असे वॅगनरने घोषणेत म्हटले आहे.
वॅगनरची ही घोषणा राष्ट्रपती पुतिन यांच्यासाठी थेट आव्हान मानले जात आहे. या बंडखोरीनंतर राष्ट्रपतींचे निवासस्थान क्रेमलिन अलर्ट मोडवर असून संपूर्ण मॉस्को शहर अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अनेक महत्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वॅगनरचे बंड आणि घोषणेनंतर रशियासाठी पुढचे काही तास अतिशय महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
येवगेनी पुढचे राष्ट्रपती?
पुतिन यांच्याविरोधातील बंडखोरीचे नेतृत्व वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोगिन करत आहेत. तेच रशियाचे पुढचे राष्ट्रपती असू शकतात असे बोलले जात आहे. वॅगनरने रशियन शहर रोस्तोवचा ताबा घेतल्याचा दावा केला आहे. असे मानले जाते की येवगेनींना सत्तापालट करायचा आहे.
पुतिन यांनि रशियाला संबोधित केले
दरम्यान, रशियातील प्रायव्हेट आर्मी वॅगनरच्या बंडानंतर पुतिन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले- आम्ही आमच्या देशाला अंतर्गत बंडखोरीपासून वाचवू. वॅगनरने आमच्या पाठीत वार केला आहे. त्यांनी लष्कराला आव्हान दिले आहे. खासगी लष्कराने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचे रक्षण करू.