एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या अनेक विरोधी पक्षांनी काल भाजपविरोधात पाटण्यात बैठक (Patna Opposition Meeting) बोलावली होती. या बैठकीसाठी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेदेखील (Uddhav Thackeray)पोहोचले होते. यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केली म्हणून ठाकरे ज्यांना टोमणे मारायचे त्या मेहबुबा मुफ्तींच्या शेजारीच ते बसले. यावर काल अनेकांकडून टीका करण्यात आली. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही (Eknath Shinde) सत्तेसाठी काहीही करणार्या उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत, असं वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खडसावले.
सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशा लोकांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असं एकनाथ शिंदेंनी म्हटल्याने बाळासाहेबांच्या विचारांचा दावा करणारे उद्धव ठाकरे तोंडघशी पडले आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra