
आमदार महेंद्र दळवी यांचे टीकास्त्र
पेण : शेतकरी कामगार पक्ष हा म्हातारा झालेला पक्ष असून शेकापला ना आकार ना उकार नसल्याची टीका अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली. मुरूड तालुक्यात बोर्ली नाक्यावर जल मिशन अंतर्गत घरोघरी नळ या संकल्पनेच्या पुर्ततेसाठी फणसाड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा शानदार भुमीपुजन कार्यकम आमदार दळवी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
बोर्ली नाका येथे आमदार महेंद्र दळवी व मान्यवरांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून १८ कोटी ५ लाख निधीतील फणसाड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे नुतन कामाचे भुमिपुजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना आ. महेंद्र दळवी यांनी सांगितले की, शेतकरी कामगार पक्ष म्हातारा झालेला पक्ष असून शेकाप पक्षाला कोणताच आकार व कोणताच उकार राहिलेला नाही. तसेच या मतदार संघात राष्ट्रवादी संपलेला पक्ष असून मतदार संघात हजारो कोटींची विकास कामे सुरू आहेत.
शेकापसह इतर सर्वच विरोधी पक्षाने मुरुडकरांना फसवले आहे. मी झोपेत पण फक्त मतदार संघाच्या विकासाचा विचार करत असतो. मी भूमिपूजन केलेला कोणताही काम पूर्णत्वास नेतो. फणसाड प्रादेशिक पाणी पुरवठा योजना येत्या सहा महिन्यांत कार्यन्वित होईल. महिलांच्या डोक्यावरचा हंडा येत्या सहा महिन्यात उतरेल. मी सर्वच विकास कामे थेट करत असतो. विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार्या मुरूड तालुक्याला त्यांनी दत्तक घेतल्याचे जाहीर करून मुरूडचा सर्वांगिण विकास हेच ध्येय असल्याचे म्हटले. यावेळी भगिरथ पाटील, दिपेश्री पाटील, अजगर दळवी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख रूपेश पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे, शिवसेना नेते सी. एम. ठाकूर, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ, अलिबाग तालुका प्रमुख प्रफुल्ल मोरे, सुनिल दिवेकर, उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, भारत मोती, सुरेश पालवणकर, सनी सोंगावकर, महिला तालुका प्रमुख दिपेश्री पाटील, बोर्ली शाखा प्रमुख राजू भोईर, सतेज ठाकूर, मुरूड तालुका युवा प्रमुख अमोल लाड, शैलेश रातवडकर, धर्मेद्र गायकवाड, डॉमणिक पेनॉ, राजा चवरकर, अजगर दळवी आदी प्रमुख मान्यवरांसह बोर्ली, कोर्लई, सुरई, चिंचघर, मांडळा, महाळुंगे, काकळघर, भोईघर, बारशीव, मिठेखार, वळके आदी पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
अलिबाग व मुरूड तालुक्यात जलमिशन योजने अंतर्गत २३० कोटी निधी आ. महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने मंजुर करण्यात आली आहे. बोर्ली पंचक्रोशीत पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या लक्ष्यात घेवून धर्माचा कोंडा-वांदेळी साठवण टाकी-तलाव ११ कोटी, काकळघर पाणी पुरवठा योजनेसाठी २४ लाख निधी, वांदेळी २४ लाख, महाळुंगे खुर्द व मांडळा ५५ लाख निधी, बोर्ली १ कोटी ९ लाख, सुरई ५२ लाख निधी, कोर्लई १ कोटी ६० लाख, साळाव ५० लाख, आमली-मिठेखार २२ लाख निधी देण्यात आला आहे. फणसाड प्रादेशिक पाणी पुरवठा अंतर्गत १८ कोटी ५ लाख रूपये निधी आ. महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच बोर्ली फाटा ते चिंचघर रस्ता ३ कोटी ७५ लाख, आमली बापदेवी मंदिर १५ लाख, चेहेर लक्ष्मी नारायण मंदिर ४० लाख, शिरगाव बापदेव मंदिर २० लाख आदी निधीला आ. महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने बोर्ली पंचक्रोशीत मंजूर केली आहेत.