देशाचे नेतृत्व कणखर, विकासाला प्राधान्य देणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि व्यापक दूरदृष्टीधारक असेल, तर त्याची छाप केवळ देशातच नव्हे, तर जगभरात उमटलेली दिसते, याचे जीते जागते उदाहरण म्हणजे आपले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होय. मोदींनी २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून देशाच्या सर्वंगीण विकासाचा जणू ध्यास घेतला असून, त्यासाठी ते अहोरात्र झटून काम करीत आहेत आणि मंत्रिमंडळातील तसेच पक्षातील आपल्या सर्व सहकाऱ्यांनाही काम करण्यास प्रोत्साहित करीत आहेत, त्यांना सदोदित मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या सजग नेतृत्व गुणाचा देशाला फायदा तर होत आहेच. पण जागतिक स्तरावरही त्यांचा दबदबा वाढताना दिसत आहे, हे मोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या व बहुचर्चित अशा अमेरिका दौऱ्यावरून दिसत आहे. याच दौऱ्यादरम्यान एक मोठा योगायोग दिसून आला तो म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत योग दिन साजरा केला. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’, असा व्यापक नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनी दिला. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात योग दिवस कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित योग सत्रात अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी सामील झाल्याने हा कार्यक्रम गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद झाला. योग दिनानिमित्त अमेरिकेत आयोजित या कार्यक्रमात १८० देशांतील प्रतिनिधी सहभाग घेतला होता. योग भारतातून आला व ही आपली खूप जुनी परंपरा मोदींनी जगव्यापी करून दाखवली.
मोदींनी या दौऱ्यात अमेरिकेतील विविध प्रसिद्ध उद्योगपतींची भेट घेतली. त्यांच्याशी व्यापारविषयक चर्चा केली. मोदी यांच्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या स्टेट डिनरला दोन्ही देशांतील दिग्गज उद्योगपतींनी हजेरी लावली. त्यात मुकेश अंबानी, नीता अंबानी, आनंद महिंद्रा यांच्यासह अॅपलचे सीईओ टीम कूक, सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांचाही समावेश होता. व्हाईट हाऊसमध्ये पाहुणचार घेतल्यानंतर मोदी यांनी भारतीय तसेच अमेरिकन उद्योगपतींसोबत चर्चा केली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी उपस्थित होते. यावेळी भारतात आर्थिक गुंतवणूक आणण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. मोदी यांचे गृहराज्य गुजरातला अमेरिकेने मोठी भेट दिली आहे. अमेरिकन कॉम्प्युटर चिप बनवणारी कंपनी मायक्रोनने गुजरातमध्ये २.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊसमधील कार्यक्रम संपल्यानंतर मोदींनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित केले. मोदी यांनी भारतीय तसेच अमेरिकन प्रसिद्ध उद्योगपतींची भेट घेत भारतातील गुंतवणुकीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी अमेरिकेतील दोन्ही पक्षांचे बहुतांश खासदार उपस्थित होते. मोदींनी भाषणातून चीन आणि पाकिस्तानवर जोरादार टीका करत टोलेबाजी केली. दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू असून इंडो पॅसिफिकमध्ये कुणाचा आक्रमकपणा खपवून घेणार नाही, अशा शब्दांत त्यांनी चीन आणि पाकिस्तानला फटकारले आहे.
मोदींनी दोन्ही देशांना भेडसावणाऱ्या दहशतवादाच्या मुद्द्याला हात घालताना सांगितले की, अमेरिकेत ९/११ आणि भारतात २६/११ सारखे अतिभीषण अतिरेकी हल्ले झाले. या हल्ल्यांचा आपण धीराने मुकाबला केला आणि सूत्रधारांना कंठस्नानही घातले. पण दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू असून त्याला पद्धतशीरपणे मोडून काढावे लागेल. एकजुटीने काम केले, तरच आपण दहशतवादाचा सामना करू शकतो. तसेच यापुढे दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच इंडो पॅसिफिक क्षेत्रात कोणत्याही देशाने आक्रमकपणा दाखवण्याची गरज नाही. आम्ही संपूर्ण प्रदेशात शांती आणि स्थैर्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे सांगत त्यांनी चीनलाही कडक शब्दांत सुनावले आहे. मोदींच्या भाषणाला अमेरिकेच्या दोन्ही पक्षांतील खासदारांनी चांगली दाद दिल्याचे दिसून आले. सध्याची वेळ ही काही युद्धाची वेळ नाही. युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे झालेला रक्तपात थांबणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद करम रशियाच्या आगळीकीबाबत जाहीर मतप्रदर्शन केले. याबाबत केवळ चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. भारतातर्फे आम्ही अनेकदा शांततेचे आवाहन केले होते, याचीही त्यांनी यावेळी आठवण करून दिली.
भारतात काय सुरू आहे, याची संपूर्ण जगाला जिज्ञासा असते. भारताची लोकशाही, विविधता आणि तेथील विकास या सर्व गोष्टी अनेक लोकांना समजून घ्यायच्या आहेत. याशिवाय भारत एखादी गोष्ट कशा प्रकारे पूर्ण करतो, हे देखील जगाला जाणून घ्यायचे आहे, असे सांगत मोदींनी भारताचे महत्त्वही अमेरिकेच्या संसदेत विषद केले. या दौऱ्यात मोदी यांच्या लोकप्रियतेची जादू अमेरिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केल्यानंतर तिथले खासदार पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी उत्सुक होते. त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी खासदारांनी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. मोदी यांच्या या शासकीय दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका या जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहीवादी देशांदरम्यानची भागीदारी अधिक दृढ होईल.