- रवींद्र तांबे
एकीकडे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या बातम्यांमुळे समुद्रकाठावरील नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तेव्हा समुद्रकाठच्या जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. असे असले तरी यावेळी पावसाचे आगमन होण्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळे धुळीने सर्वांना माखून टाकले. इतकेच नव्हे तर घरामध्ये सुद्धा धुळीने अंथरून घातले. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घराची सफाई करावी लागली. ११ जून रोजी रिमझिमत्या पावलाने पावसाचे आगमन झाले. मात्र आपण येत आहोत, याची चाचपणी करून गेला. यात कोकणात काही ठिकाणी पावसाच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता जून महिना अजून एका आठवड्याने संपेल. तरी पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. यात काही ठिकाणी दुबारा पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे.
आता पाऊस लवकरच येईल, असे वातावरण दिसत असले तरी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कुडाळसारख्या तालुक्यात काही गावांना टॅन्करने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. मग सांगा इतर गावांचे काय झाले असेल. आता असे काही रूप पाऊस धारण करेल की, आपल्याला घरातून बाहेर पडू देणार नाही. शेवटी निसर्गाच्या पुढे कोणाचेही चालत नाही हे सत्य आहे. त्यामुळे सध्या चातक पक्षाप्रमाणे ‘पावसा गो’ करण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे. काही शेतकरी तर आकाशाकडे डोळे लावून आहेत. त्यात मिरगसुद्धा सुखा गेला. तेव्हा कधी एकदा पाऊस पडतो आणि भात पेरतो असे शेतकरी राजाला झाले आहे. म्हणजे शेतकरी राजाची सुगीची कामे सुरू होतील.
कोकणात काही ठिकाणी रिमझिमत्या आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या विश्वासावर भात पेरणी केली, तर काही शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जमीन ओली झाल्यावर नांगरणी करणे सुलभ होईल. नदी-नाल्यांना पाणी सुटेल आणि पुढील शेतीची कामे सुरू करता येतील. काही शेतकरी दादा आपल्या जवळ असलेल्या अनुभवाच्या जोरावर पेरणी करतात. त्यात बऱ्याच वेळा यशस्वी होतात. अलीकडच्या काळात काही वेळा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला नव्हता. त्यामुळे शेतकरी दादाला काही प्रमाणात धोका सहन करावा लागला होता. शेवटी ही नैसर्गिक आपत्ती आहे. आता उशिरा का होईना पावसाचे आगमन होईल, अशी आशा व्यक्त करूया.
मागील एक महिना शेतकरी राजा आकाशाकडे अधून मधून नजर लावून होता. मात्र कडक उन्हामुळे त्याला पावसाचा अंदाज घेता येत नव्हता. आता संध्याकाळची गार हवा आणि त्यात अधूनमधून पडणारा काहीसा रिमझिम पावसामुळे शेतकरी राजा आनंदित वाटत असला तरी त्यांचा पावसावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे अधिक चिंतेत दिसत होता. शेतकरी राजा आपला पारंपरिक व्यवसाय व उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन ‘शेती’ असल्यामुळे शेतीकडे लक्ष देत आहे. सध्याच्या परिस्थितीत बैल जोडी परवडत नाही. म्हणून मोठे शेतकरी स्वत: ट्रॅक्टर घेतात किंवा भाड्याने ट्रॅक्टर घेऊन शेत जमिनीची नांगरणी करतात. ज्या शेतकऱ्याची बैलजोडी आहे तो नांगराच्या सहाय्याने नांगरणी करू शकतो. मात्र त्यासाठी जमीन भिजण्याइतका किमान पाऊस पडणे गरजेचे असते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुखी जमीन सुद्धा नांगरू शकतो.
मागील दहा वर्षांचा राज्यातील शेतकऱ्यांचा शेतीविषयक अभ्यास केल्यास त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील शेतकरी राजाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याचा विचार करता शेतीला योग्य बी-बियाणे, रासायनिक खते. त्याचप्रमाणे गावागावात कृषी विभागाचे योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे. तेसुद्धा केवळ शासन आपल्या दारी, शासन आपल्या शेताच्या बांधावर इतके म्हणून शासनाने थांबू नये, तर शासन शेतकऱ्याने नांगरलेल्या कोपऱ्यात जाऊन प्रत्यक्षात शेतकरी राजाला नांगरणी व लावणीचे प्रात्यक्षिक दाखविले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा पावसाळ्यात कृषी विभागाची तज्ज्ञ मंडळी येते आणि ग्रामपंचायतीमध्ये कशा प्रकारे शेतीची लागवड करायची याची माहिती देतात.
यात गावातील खरा शेतकरी अशा माहितीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जातच नाही. त्यांना एकच माहीत की, असे जाऊन आपला काय फायदा होणार. शेवटी संकट आले की, आपल्यालाच तोंड द्यावे लागते. शेती, तर काय पावसावर अवलंबून असते. तेव्हा प्रत्येक गावातील अशा शेतकऱ्यांना एकत्र करून शासनाने आपल्या स्तरावर सामूहिक शेती करावी. त्याला योग्य कर्ज द्यावे. पीकविमा द्यावा, उत्पादित झालेले उत्पन्न स्वत: खरेदी करावे. जे गटात समाविष्ट केलेले असतील, त्यांना समप्रमाणात हिस्सा द्यावा. म्हणजे त्यांना तेवढा आर्थिक फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचावू शकते. यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे पुढाकार घेणे आवश्यक आहे.
बऱ्याच प्रमाणात नैसर्गिक आपत्ती येऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते. सध्या तर माकडदादा रोज सकाळ-संध्याकाळ शेताच्या बांधावर दिसतात. त्यामुळे शेतीची राखण करावी लागते. काही वेळा शेतकऱ्याची नजर चुकवून शेतीचे नुकसान करतात तसेच मोकाट सुटलेली गुरेसुद्धा शेतीची नासधूस करतात, यामुळे शेती करूच नये, असे शेतकऱ्यांना वाटते. जून महिना संपत आला तरी शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तेव्हा जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी राजाला आर्थिक आधार देणे हे राज्य सरकारचे आद्यकर्तव्य आहे.