आज प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. असे कोणतेच क्षेत्र नाही जेथे मुली किंवा महिला कार्यरत नाहीत. (Women Power ) सर्व क्षेत्रे त्यांनी पादाक्रांत केली आहेत. असे असले तरी त्यांच्या भोळ्या-भाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जात असून त्यांची फसवणूक केली जात आहे. मात्र आता ‘तुम्ही अबला नाहीत, सबला आहात’, हे आज दाखवून देण्याची, सिद्ध करण्याची वेळ आली आहे. मुलींनी झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ यांचा इतिहास आणि कर्तृत्व जाणून घेऊन त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शूर आणि धाडशी बनण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आज तमाम महिला आणि युवतींवर आली आहे.
शाळा, महाविद्यालयात मुलींना शिक्षणासाठी जावे लागते. महिलांनाही कामाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावे लागते. अशावेळी बाहेर कोणता प्रसंग कधी कुणावर ओढवेल हे सांगता येत नाही. अशाप्रसंगी आपल्याकडे धाडस, हिंमत असणे आवश्यक आहे. शिवाय याबाबतचे प्रशिक्षण असेल तर उत्तमच. मी मुलगी आहे, महिला आहे, मी काहीच करू शकत नाही अशी नकारात्मक भावना मनात न आणता प्रसंगाला धैर्याने तोंड दिले पाहिजे. कारण तशी वेळच आली आहे. मुली – महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता प्रत्येकीने झाशीची राणी बनण्याची गरज आहे. स्वतःचे संरक्षण स्वतःच करण्याची आज गरज निर्माण झाली असून मैदानी खेळ, दांडपट्टा, कूंग फू, कराटे आणि जिममध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले पाहिजे आणि आपली हिंमत आणि प्रतिकारशक्ती वाढवून धाडसी वृत्ती अंगी बाळगली पाहिजे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांत महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा प्रकरणात महिलांवर अत्याचार करून ठार मारण्यात येत आहे. त्यांच्या मृतदेहाची जी विल्हेवाट लावण्यात येते ती अतिशय किळसवाणी आणि घृणास्पद तर आहेच, शिवाय मन विषण्ण करणारी आहे. वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची आफताब पूनावाला या इसमाने दिल्लीत निर्घृण हत्या केली होती. तिच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. काही तुकडे जंगलात नेऊन टाकले होते. अशीच एक घटना नुकतीच मीरा रोड येथे घडली. मनोज साने नावाच्या ५६ वर्षीय इसमाने सरस्वती वैद्य या ३४ वर्षीय महिलेची हत्या केली. त्यानेही हत्या केल्यानंतर या महिलेचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवल्याचा घृणास्पद प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत साक्षी नावाच्या तरुणीला साहिल खान नामक तरुणाने भर रस्त्यात भोसकून ठार मारले. तिच्यावर त्याने चाकूने २४ वार केले होते. मुंबईत चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात एका मुलीची हत्या करण्यात आली. हिंदी मालिकेत काम करणाऱ्या ट्युनिशा शर्मा नावाच्या अभिनेत्रीने सेटवरच गळफास लाऊन आत्महत्या केली होती. झिशान खान नावाच्या कलाकाराच्या प्रेमात ती पडली होती. लिव्ह इन रेलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या घटना आहेत. यात दोघांचे संबंध बिघडले की, त्याचा एकट्या महिलेला पुरुषी वृत्तीचा कसा त्रास होतो किंवा त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जाते. दिल्लीतील निर्भयाचे प्रकरण सर्वांनाच ठाऊक आहे. अशा या संबंधांना समाजात मान्यता नाही किंवा कायद्याचेही संरक्षण नाही. ‘लव्ह जिहाद’च्याही काही घटना घडत आहेत. ‘लव्ह जिहाद’च्या घटनांवर भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने आवाज उठवत आहेत आणि समाजाला सजग करीत आहेत. एकूणच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती ऐरणीवर आला, हे या घटनांवरून दिसून येते.
राज्य सरकारचा महिला व बालकल्याण विभाग, राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्था यांच्या साहाय्याने राज्यातील ३ लाख ५० हजार शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना आता स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने ३ ते १५ जुलै दरम्यान गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तीन दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम असेल. राज्य सरकारने याचे नियोजन केले आहे.
समाजातील काही लोकांच्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढा देण्याची गरज असून प्रेमाच्या आणाभाका न घेता, प्रेमाच्या जंजाळात न अडकता आपले जीवन सुखी करण्यासाठी तरुणींनी गांभीर्यपूर्वक विचार करण्याची वेळ आज महिला, तरुणींवर आली आहे. आता मुली – महिलांवर रडण्याची नाही तर, लढण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल. अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समजा समोरील मोठे आव्हान ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. युवतींसाठी प्रशिक्षण हे त्यादृष्टीने राज्य सरकारने टाकलेले पाऊल आहे, असेच म्हणावे लागेल.