गुवाहाटी: गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने आसामची परिस्थिती बिकट बनली आहे. ३१ पैकी १० जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. राज्यातील १.२ लाख लोकांना आपली घरे आणि जमीन सोडून छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ऑरेंज अलर्ट दिला आहे. ब्रह्मपुत्रेची उपनदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
दरम्यान, मान्सून तळकोकणातच अडकला असून त्याच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. परंतु, सध्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत आज मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.
तर, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण येथे उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तसेच तामिळनाडू वगळता दक्षिण भारतात ६०% ते ८०% पावसाची कमतरता आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचा मध्य आणि पूर्व भागदेखील कोरडा आहे. या राज्यांमध्ये पावसाची तूट ८०%-९०% पर्यंत वाढली आहे.