Monday, May 5, 2025

विशेष लेखसंपादकीय

Nitesh Rane : आश्वासक नेतृत्व नितेश राणे!

Nitesh Rane : आश्वासक नेतृत्व नितेश राणे!
  • चंद्रशेखर बावनकुळे : प्रदेशाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र

नितेश राणे... या नावानं राज्याचे राजकारण ढवळून काढले. अत्यंत कल्पक, मुद्देसूद बोलून आक्रमक शैलीने परिचित झालेले हे व्यक्तित्त्व! चाळीस वर्षांचे हे तरुण, उमदे नेतृत्व महाराष्ट्र विधानसभेत २०१४ सालापासून कणकवलीचे प्रतिनिधित्व करत आहे. विधानसभेत एखाद्या विषयावर भाषण करताना ते त्या विषयाच्या मुळाशी जाऊन अनेक गोष्टींचा भंडाफोड करतात. कोणतीही भीडभाड न बाळगता ते त्या विषयांवर भाष्य करतात. अभिनेता सुशांतसिंह राजपूत तसेच दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू असो, नितेश राणे यांनी यावर अनेक गौप्यस्फोट केलेले जनतेने पाहिलेले आहेत. ते बेफाम आरोप करतात असे त्यांचे विरोधक बोलतात; परंतु ज्यांच्यावर ते आरोप करतात त्यापैकी कोणीही नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करायला धजावत नाहीत.

स्वाभिमान संघटना, या स्वयंसेवी संघटनेचे ते संस्थापक आहेत. या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य तसेच उपक्रम ते चालवतात. कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते कायम कार्यरत असतात. तेथील पायाभूत सुविधा लवकरात लवकर तयार व्हाव्यात याकरिता सुरू असलेले त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.

लोकांची कामं लवकरात लवकर झाली पाहिजेत, यावर त्यांचा भर असतो. मग, मुंबई-गोवा महामार्गाचे काम असो किंवा सिंधुदुर्गातल्या मच्छीमारांच्या समस्या असोत, नितेश राणे कायम आपल्या मुद्द्यांवर ठाम राहतात आणि तेथील जनतेचे हित साधण्यासाठी जे जे काही करणं शक्य आहे ते करत राहतात. या जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या समस्या जाणून घेऊन आंब्याच्या फळाला तसेच काजूच्या बोंडांना निश्चित असा भाव मिळावा, या फळांच्या उत्पादनाला उद्योगाचा दर्जा मिळावा याकरिताही नितेश सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.

महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा जेव्हा जेव्हा ऐरणीवर येतो, तेव्हा तेव्हा नितेश नेहमी आक्रमक झालेले दिसतात. लव्ह जिहादच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या अहमदनगर, औरंगाबाद, सांगली अशा अनेक ठिकाणी विविध हिंदुत्ववादी संस्था-संघटनांच्या सोबतीने रस्त्यावर उतरून त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढाकार घेतला आहे. लव्ह जिहादला रोखण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा तयार करावा, अशी मागणी ते सातत्याने करत आहेत.

ठाकरे गटाची भंबेरी आपल्या वाकचातुर्याने ते उडवून देतात. या त्यांच्या सडेतोड भूमिकेमुळे महाराष्ट्रात एक नवे, दमदार आणि आश्वासक नेतृत्व उदयास येत आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा!

Comments
Add Comment