Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यPlastic pollution : प्लास्टिक,मायक्रो प्लास्टिक किती घातक?

Plastic pollution : प्लास्टिक,मायक्रो प्लास्टिक किती घातक?

ज्योती मोडक : मुंबई ग्राहक पंचायत

नुकताच ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण अशा अनेक प्रकारांनी प्रदूषित होणारे पर्यावरण आणि साहजिक त्याचा सजीव सृष्टीवर होणारा दुष्परिणाम यावर खूप लिहिले जाते, बोलले जाते. कृती करण्यावर भर देण्यात येतो आणि जनजागृती केली जाते. या सर्व घटकांबरोबरच वातावरणावर प्लास्टिकचा होणारा गंभीर परिणाम ही सुद्धा एक चिंतित करणारी समस्या बनली आहे. नुकतेच वर्तमानपत्रातील बातमीवरून समजले की, प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा १२ लाख किलोंनी वाढला आहे. सन २०२१ मध्ये ४६ लाख ९८ हजार १६४ किलो प्लास्टिक बाटल्या सापडल्या, तर सन २०२२ मध्ये ५८ लाख ९८ हजार ११४ किलो प्लास्टिक बाटल्या सापडल्या.

त्यापुढे जाऊन आणखी एक चिंतित करणारी बातमी वर्तमानपत्रातून वाचनात आली ती म्हणजे मायक्रोप्लास्टिकचा शरीरावर होणारे गंभीर परिणाम.

मंडळी, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक वेष्टने या स्थूल गोष्टी व त्यांच्या वापराबद्दल अधिक कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर देऊन प्लास्टिक वापर कमी करता येईल. पण दात घासण्यासाठीचा ब्रश, पाण्याची बाटली वापरात असताना त्यातील पाण्याबरोबर जाणारे मायक्रोप्लास्टिक, प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवलेल्या अन्नपदार्थातून शरीरात जाणारे मायक्रोप्लास्टिक हे थेट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असते आणि मेंदूवर त्याचा दुष्परिणाम करीत असते. हे खूपच गंभीर आहे.

काय आहे हे मायक्रो प्लास्टिक?

युरोपीय केमिकल एजन्सीनुसार मायक्रोप्लास्टिक हे पाच मिलिमीटरपेक्षा कमी लांबीचे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिकचे कण. यामध्ये कपड्यांचे मायक्रोफायबर, मायक्रोबीड्स, प्लास्टिक पेलेट्स यांचा समावेश आहे. तसेच टायर्स, सिन्थेटिक टेक्स्टाइल्स, मरीन कोटिंग्स, रोड मार्किंग्स, काही पर्सनल केअर प्रॉडक्ट्स वगैरे सुद्धा मायक्रो प्लास्टिक म्हणून ओळखले जाते. तसेच सिटी डस्टमध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक आढळते. त्याशिवाय मायक्रो प्लास्टिक हे बिअर, वाईनमध्ये पॉलिथिलीन स्टॉपर्स म्हणून असते तर तांदूळ, टेबल सॉल्ट मध इ. मध्येही हे आढळते तर सफरचंद, गाजर, ब्रॉकली इ. भाज्या/फळे त्यांच्या मुळांवाटे नॅनोप्लास्टिक शोषून घेतात.

या मायक्रो प्लास्टिकमुळे शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होते. ते कण लाल पेशींच्या बाहेरील भागाला चिकटतात त्यामुळे ते प्राणवायूचा प्रवास रोखू शकतात. याचा परिणाम म्हणून उतींमध्ये प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ शकतो. मायक्रो प्लास्टिक शरीराच्या सर्वच संस्थांवर (पचनसंस्था, मज्जासंस्था इ.) घातक परिणाम करते असेही संशोधनाअंती आढळून आले आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आपण एक लाखाहून अधिक मायक्रोप्लास्टिकचे कण कधी कधी शरीरात रिचवतो. ‘टेक्साईल’ हे सर्वात जास्त एअरबॉर्न मायक्रोप्लास्टिकचा स्त्रोत आहे असे शास्त्रज्ञ सांगतात. मायक्रोप्लास्टिक खाण्यामधून शरीरात गेले तर ते पेशींचे नुकसान करतेच पण शरीरात ‘गॅस्ट्रो एन्टेरिटिस’ हा पोटाचा विकार जडू शकतो त्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. श्वसनाचा विकार जडू शकतो तर वंधत्वाची परिणिती ही यांच्या अतिसेवनाने येऊ शकते. कॅन्सर सारखा गंभीर आजारही होऊ शकतो इतकेच नाही तर शरीराच्या गुणसूत्रावरही परिणाम होतो. तेव्हा मंडळी, हे मायक्रो प्लास्टिक संथगतीने शरीरावर दुष्परिणाम घडवून आणते. काही वेळा तर शरीराचे नको इतके वजन वाढते आणि त्यामुळेही इतर आजारांना आमंत्रण मिळते. इतकेच नाही, तर गर्भातील मेंदूच्या वाढीवर परिणाम करते, तर लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम करते. इतके हे मायक्रो प्लास्टिक घातक आहे.

प्लास्टिकपासून पूर्णपणे दूर राहणे कठीण आहे हे खरे जरी असले तरी अशक्य नाही. आपल्या रोजच्या जीवनातला त्याचा वापर कमीत कमी कसा करता येईल याचा विचार, प्रयत्न आणि मग त्याची अंमलबजावणी ही प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. या मायक्रोप्लास्टिकचा शरीरात कमीत कमी शिरकाव होईल, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.

मायक्रोप्लास्टिकला टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे तर…

१. प्रक्रिया केलेले अन्न खाणे शक्यतो टाळावे किंवा कमीत कमी खाल्ले जाईल याची खबरदारी घ्यावी.
२. शक्य तो प्लास्टिक बाटलीत पाणी साठवून पिऊ नये फिल्टर केलेले नळाचे पाणी प्यावे.
३. इको फ्रेंडली बाटल्यांचा जसा की काचेच्या बाटल्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या यांचा वापर करावा. घरी काचेचा ग्लास किंवा स्टीलचा ग्लास वापरावा.
४. काही अन्नपदार्थांसाठी किंवा खाण्याच्या वस्तूंसाठी इको फ्रेंडली पॅकेजिंग वापरावे.
५. फ्रीजमध्ये प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी ठेवणे टाळावे. काचेच्या बाटल्यांचा वापर करावा.
६. मायक्रो वेव्हमध्ये अन्न पदार्थ गरम करताना प्लास्टिक कंटेनरचा वापर करू नये.
७. ज्यावेळी आपण हॉटेलमधून काही अन्नपदार्थ जर घरी घेऊन जाणार असू, तर इको फ्रेंडली रिफिलेबल (Refillable) कंटेनरचा वापर करावा.

प्लास्टिकच्या विघटनाला हजारो वर्षे लागतात. हे मायक्रो प्लास्टिक वातावरणावर गंभीर परिणाम करतात. ते विघटनशील नाहीत. वातावरण विषारी (toxic) करून टाकतात. समुद्रामधील प्लास्टिक/मायक्रो प्लास्टिक सागरी जीवनही दूषित करतात. याबाबत जनमानसात फारशी जागृती असलेली दिसत नाही. हे सर्व टाळण्यासाठी वरती उल्लेखिलेल्या उपायांचा अवलंब प्रत्येक जागरूक ग्राहकाने करायला हवा जेणेकरून आपल्या पुढील पिढ्यांना तरी काही प्रमाणात आरोग्यपूर्ण वातावरण/पर्यावरणाचा लाभ घेता येऊ शकेल व प्रकृतिस्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होईल.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -