मुंबई: करोना काळात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरच्या कंत्राटातील घोटाळ्याप्रकरणी ईडीचे कारवाई सत्र जोरदार सुरु आहे. आज महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरी ईडीने धाड टाकली. ईडीच्या या झाडाझडतीत संजीव जयस्वाल यांच्या पत्नीची डोळे विस्फारायला लावणारी संपत्ती समोर आली आहे.
संजीव जयस्वाल यांच्या पत्नीकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून तब्बल ५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. तसेच जयस्वाल यांच्या पत्नीच्या नावे मढ आयलंडला अर्धा एकर जमीन आणि अनेक फ्लॅटस आहेत. या सगळ्या मालमत्तांची एकूण किंमत जवळपास ३४ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय, जयस्वाल यांच्या पत्नीच्या नावे बँकांमध्ये १५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.
दरम्यान, ईडी अधिकाऱ्यांकडून संजीव जयस्वाल आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या संपत्तीचा तपशील आणि स्रोत विचारण्यात आला. त्यावेळी जयस्वाल यांच्या पत्नीने मढ आयलंड येथील भूखंड हा वडिलांकडून भेट मिळाल्याचे सांगितले. जयस्वाल यांच्या पत्नीचे वडील महसूल खात्यातील माजी अधिकारी होते. आई-वडील आणि आजी-आजोबांनी मढ आयलंड येथील भूखंड आपल्याला दिल्याचे जयस्वाल यांच्या पत्नीने सांगितले.
दरम्यान, ईडीने जयस्वाल यांना गुरुवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र ते गैरहजर राहिले. कंत्राट वाटपातील नेमकी भूमिका व कंत्राटाला मंजुरी देण्याच्या दस्तावेजांवर स्वाक्षरी केली अथवा नाही, हे जाणून घेण्यासाठी जयस्वाल यांची चौकशी होणार असल्याचे ईडीतील सूत्रांचे म्हणणे आहे.