दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी
शेवगाव : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात सातत्याने खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आज अहमदनगरमधील शेवगाव (Shevgaon) येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय ५५ वर्ष) यांच्या राहत्या घरावर आज २३ जूनला भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला. घरातील काही ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.
गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरिकिशन बलवा (वय ६५ वर्ष) या दोघांचा या दरोड्यामध्ये झालेल्या मारहाणीदरम्यान मृत्यू झाला, तर गोपीकिशन यांच्या पत्नी सुनिता बलदवा जखमी झाल्या आहेत. दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. या दरोड्याच्या निषेधार्थ आज शेवगाव बंद पुकारण्यात आला आहे. व्यापारी आणि ग्रामस्थांनी ही बंदची हाक दिली असून पोलिसांनी तातडीने घटनेचा छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडेंनी व्यक्त केली नाराजी
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात ते म्हणाले, “शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा,” शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
नेमके काय घडले?
दरोडेखोरांनी प्रथम गौरव बदलवा यांच्या घराला बाहेरुन कडी लावली व नंतर वेगळ्या मार्गाने गोपीकिशन बदलवा यांच्या घरात प्रवेश करुन झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर गजाने प्रहार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चोरी करताना पुष्पा बदलवा जाग्या झाल्याने त्यांनाही जीवे मारले. या घटनेत तीन चोरटे दुचाकी वाहनावरुन आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक बी. चंद्रकात रेड्डी, पो. नि. विलास पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले.