
इंदापूर : राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत.
पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये संपन्न झाला. तुकोबारायांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून रथाचे स्वागत केले. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदाने धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वाने दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. इंदापूर परिसरातील शेकडो नागरिकांनी रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सकाळी अकराच्या सुमारास इंदापूर गाठले. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालय प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारायांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. तिथे मंडप उभारून रिंगणाची तयारी आधीच करण्यात आली होती.
तुकाराम महाराजांचा आजचा मुक्काम इंदापूरमध्ये असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम बरड येथे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज फलटणहून बरडकडे प्रस्थान ठेवले. यावेळी फलटणवासियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पालखीला निरोप दिला. अनेक फलटणवासियांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांचा पाहुणचार केला. कुटुंबियांप्रमाणे त्यांचे स्वागत केले. त्यानंतर रात्री वारकऱ्यांनी अनेक ठिकाणी भजने केली आणि पुन्हा एकदा पंढरीच्या वाटेकडे रवाना झाले. सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे. सगळेच वारकरी पंढरीच्या वाटेने विठुनामाचा गजर करत एक एक पाऊल टाकत आहे.