
- जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
विश्वात जे काही चाललेले आहे ते त्याच्याच म्हणजेच परमेश्वराच्याच सत्तेने चाललेले आहे. परमेश्वराचे प्रगटीकरण आहे, Projection आहे ते चाललेले आहे. हे जे चाललेले आहे त्यालाच चळत असे म्हटलेले आहे. “विश्व चळत असे जेणे परमात्मने”. त्याच्या नुसत्या असण्याने हे जग चाललेले आहे. म्हणून जग नाही असे कधी होत नाही. त्याच्या अंगातून हे होत असते, स्फुरत असते. हे का होते? स्फुरण होते याचे कारण आनंद हा स्फुरद्रूप आहे. आनंद होतो, तेव्हा माणूस आनंदाने व्यक्त करतो. परीक्षेत पहिला की, आनंदाने पेढे वाटतो. बक्षीस मिळाले की, आनंदाने उड्या मारतो. कोणी सिक्सर मारला की, माणसे टाळ्या वाजवतात, ते आनंदाच्या भरात, यालाच स्फुरण असे म्हणतात.
आनंद हा असा स्फुरद्रूप असल्यामुळेच त्याच्या ठिकाणी जाणीव आहे, त्याच्या ठिकाणी दिव्य ज्ञान आहे. त्या जाणिवेला आनंदाचा स्वाद घेण्याची प्रेरणा होते. ही प्रेरणा जरी निर्माण झाली तरी जाणिवेला आनंदाचा स्वाद घेता येत नाही. आपल्याच अंगी असलेला आनंद आपल्याला सतत भोगत येतो का? तो जसा आपल्याला भोगत येत नाही तसेच परमेश्वराच्या ठिकाणी जी जाणीव आहे, तिला आनंदाचा स्वाद घेता येत नाही, म्हणून जी जाणीव स्फुरते, ती आनंदाला घेऊन स्फुरते.
“एकोहं बहुस्याम प्रजयायेम”. अनंत कोटी ब्रह्माण्डाच्या रूपाने ती प्रगत होते म्हणून विश्वात आनंद आहे. विश्वात शक्ती आहे. त्याच्या ठिकाणी जाणीव आहे त्याच्या ठिकाणी दिव्य ज्ञान आहे हे अनुभवले, तरच अनुभवता येणार. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, तर काय उपयोग? जग कधीही नाहीसे होणार नाही हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. काही बुवा बाबा असे सांगतात की, जग हे नाहीसे होणार. पण मी हे सांगतो की, असे काहीही होणार नाही. उलट जगाचा विस्तार होत आहे आणि आता शास्त्रज्ञसुद्धा हे सांगतात.
ज्ञानेश्वर महाजांनी हे सांगून ठेवलेले आहे,
“माझिया विस्तारलेपणाची निनावे, हे जगाची नोहे आगवे
जैसे दूध मुरले स्वभावे, तरी तेचि दही
का बिजची झाले तरू, अथवा भांगाराची अलंकारू,
तैसा मज एकाच विस्तार ते हे जग”
जगाचा विस्तार होतो आहे, तरी लोकांनी काळजी करू नये, बुवा बाबा काही सांगत असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका. हा विश्वास ठेवायचा की नाही हे तू ठरव, कारण ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’