
गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
नव्या मठात समर्थ आल्यानंतर जे काय प्रकार घडले ते आता पाहूया. मेहेकर या ठिकाणाजवळ सवडद नावाचे ग्राम आहे. तेथील गंगाभारती नावाचा गोसावी शेगाव ग्रामी आला. या गंगाभारती गोसाव्यास महारोगाची बाधा होती. त्याचे सर्व अंग कुजून गेले होते. दोन्ही पायांना भेगा पडल्या होत्या, हाता पायाची बोटे झडून गेली होती. तनू लाल झाली होती. कानाच्या पाळ्या सुजून गेल्या होत्या. सर्वांगाला खाज येत होती. अतिशय दयनीय अवस्था झाली होती त्या गोसाव्याची.
अत्यंत त्रासून गेला होता हा गोसावी त्या रोगाला. त्याने गजानन महाराजांची कीर्ती ऐकली होती. म्हणून महाराजांचे दर्शन घेण्यास शेगावी आला. लोकांनी त्याला पाहिल्यावर ते त्याला महाराजांजवळ जाऊ देत नव्हते. लोक त्याला म्हणू लागले “तुला रक्तपिती आहे. तू महाराजांजवळ जाऊ नकोस. अशा ठिकाणी दूर उभा राहा जेथून महाराज तुला दिसतील आणि दुरूनच दर्शन कर. चरण धरावयास कधीही जवळ जाऊ नकोस. कारण हा रोग स्पर्शजन्य आहे.” पण एक दिवस हा गंगाभारती गोसावी लोकांची नजर चुकवून श्री महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावयास आला. जसे त्याने महाराजांच्या पायावर डोके ठेवले तसे महाराजांनी त्याच्या मुखात दोन्ही हातांनी चापट्या मारल्या, वरतून एक लाथ मारली. महाराज खाकरले आणि बेडका त्याच्या अंगावर थुंकले. त्या गोसाव्याने तो अंगावर पडलेला बेडका प्रसाद समजून मलमाप्रमाणे सर्व अंगास चोळून चोळून लावला. हा प्रकार पाहून तिथे असणारा एक कुटाळ गोसाव्यास बोलला :
आधीच शरीर नासले।
तुझे आहे बापा भले।
त्यावरी यांनी टाकिलें।
या अमंगळ बेडक्याते॥ ७५॥
तो तु प्रसाद मानीला।
अवघ्या अंगाते चोळीला।
जा लावून साबणाला।
धुवून टाकी सत्वर॥७६॥
हे ऐसे वेडे पीर।
विचरू लागता भूमीवर।
त्यांशी अंधश्रद्धेचे नर।
साधू ऐसे मानती॥७७॥
त्याचा परिणाम ऐसा होतो।
अविधी कृत्यांस ऊत येतो।
तो येता सहज जातो।
समाज तो रसातळा॥७८॥
यासी तुझेच उदाहरण।
तू औषध घेण्याचे सोडून।
आलास की रे धावून।
या वेड्या पिश्यापाशी॥७९॥
हे ऐकून गोसावी हसू लागला आणि त्या मनुष्याला म्हणाला,
“तुम्ही येथेच चुकता. साधूपाशी अमंगळ काहीच असत नाही. अरे कस्तुरीच्या पोटी कधी दुर्गंधी वसते का? तुम्हाला जो बेडका दिसला तो हा प्रत्यक्ष मलम आहे. याला कस्तुरीप्रमाणे सुवास येतो आहे. तुला संशय असेल जरी, तरी माझ्या अंगास हात लावून पाहा. म्हणजे तुला कळून येईल. त्यात थुंक्याचे नाव नाही. सर्व औषधी आहे आणि मी देखील वेडा नाही की, बेडक्याला मलम मानील. तुझा या गोष्टीशी संबंध नव्हता म्हणून तुला तो बेडका दिसला. समर्थांची योग्यता तू मुळीच जाणली नाहीस. याचे प्रत्यंतर पाहावयास माझ्यासोबत त्या ठिकाणी चल, जिथे समर्थ प्रतिदिवशी स्नान करतात. तिथली ओली माती मी रोज अंगाला लावतो.”
असा संवाद झाल्यावर ते दोघे समर्थांच्या स्नानस्थळावर गेले. तेव्हा त्या कुटाळास गोसाव्यासारखाच अनुभव आला. दोघांनी तेथील माती हातात घेतली. गोसाव्याच्या हातातील मातीची औषधी झाली. कुटाळाच्या हातात ओली मातीच राहिली. तो प्रकार पाहून तो मनुष्य घोटाळला व कुत्सित कल्पना सोडून समर्थांना शरण आला. असो.
या गोसाव्याला कोणी जवळ बसू देत नव्हते. हा महाराजांच्या दूर बसून भजन गायन करीत असे. या गंगाभारतीचा आवाज पहाडी आणि गोड होता तसेच त्याला गायन कला देखील चांगलीच अवगत होती. असे १५ दिवस गेले आणि गंगाभारतीच्या रोगाचे स्वरूप मावळले याचे वर्णन पुढील ओव्यांतून कळून येईल :
ऐसे पंधरा दिवस गेले।
रोगाचे स्वरूप पालटले।
लालिने ते सोडिले।
तयाचिया अंगाला॥९४॥
चाफे झाले पूर्ववत।
भेगा पदीच्या निमाल्या समस्त।
दुर्गंधीचा मोडला त्वरित।
ठाव त्याचा श्रोते हो॥९५॥
या गंगाभारतीचे भजन ऐकून महाराज संतुष्ट होत असत.
महाराजांना देखील गायन कलेची आवड तसेच ज्ञान होते. त्यांचे आवडते पद होते - ‘चंदन चावल बेल की पतिया’. ग्रंथात एका ठिकाणी याचा उल्लेख अध्याय क्रमांक ३, ओवी क्रमांक ५२ व ५३ मध्ये दासगणू महाराज यांनी केला आहे. ते पुढील भागात पाहूया.
क्रमशः