- समर्थ कृपा : विलास खानोलकर
ठाकूरदास अक्कलकोटात पत्नी राधाबाईसह श्री स्वामी समर्थांची मनोभावे नित्य सेवा करीत होते. एके दिवशी बुवा दर्शनास आले असता, श्री स्वामी समर्थांनी जवळच्या पेटत्या धुनीतील एक जळके लाकूड (काष्ठ) बुवांच्या अंगावर फेकले. सेवेकऱ्यांनी जयजयकार करून बुवांस सांगितले की, तुमचे काम झाले. पुढे बुवा ते जळके काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रित करून त्याचा लेप त्यांच्या अंगावरील कुष्ठावर (कोडावर) नित्य लावू लागले. काही दिवसांत बुवांच्या अंगावरचे संपूर्ण कोड नाहीसे झाले. बुवांची पत्नी राधाबाईसुध्दा श्री स्वामी समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे. त्या उभयतांस पुत्र संतान नव्हते. राधाबाईने श्री स्वामींस पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली. श्री स्वामींनी त्यांच्या डोक्यावरील टोपी काढून राधाबाईच्या ओटीत फेकली. तिने श्री स्वामींचा महाप्रसाद समजून श्री स्वामी समर्थांस साष्टांग नमस्कार केला. पुढे बारा महिन्यांच्या आत तिला पुत्र झाला. त्याचे नाव ‘गुरुनाथ’ ठेवले.
श्री स्वामी समर्थांची अनन्य भावाने, एकनिष्ठपणे सेवा करणाऱ्यांच्या मनोकामना पुऱ्या करणाऱ्या श्री स्वामींच्या अनेक लीलांपैकी ही एक मनोज्ञ विचार करावयास लावणारी लीला आहे. आता कालमानपरत्वे जळाऊ लाकूड आणि भस्म एकत्रित करून कुणी अंगावरील कोड घालवणार नाही. कुणास असा प्रसाद सद्यस्थितीत मिळणारही नाही, हे खरे आहे; परंतु श्री स्वामींवरील अनन्य निष्ठेने, सेवेने दुःख-पीडा हरण होतात. हे त्यामागील आचार-विचार सूत्र आहे. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व, असामान्यत्व, कर्तृम-अकर्तृम सामर्थ्य समजावून घ्यावयास हवे, हा या लीलेमागचा गर्भित हेतू आहे. सद्यस्थितीत कोडावर अत्याधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध झालेले आहेत. त्याचाही उपयोग करून घ्यायचा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची उपासनाही करावी म्हणजे शाश्वत आणि त्वरित परिणाम मिळतील.
श्री स्वामी समर्थांना मूर्तीपूजा, सोवळे, ओवळे यांचे अवडंबरत्व, शरीर व मनास क्लेशकारक व्रत वैकल्ये, कर्मकांडाचे स्तोम मान्य नव्हते; परंतु ते पूजे-अर्चेतील उपासनेतील शुद्ध-निर्मोर्ही भावभक्तीला महत्त्व देत. आज निर्गुण स्वरूपातील श्री स्वामी समर्थ त्यांची अनन्यभावे सेवा करणाऱ्या ‘मै गया नहीं जिंदा हूं।’ आणि ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे अभिवचन सदैव देत असतात. त्यानंतर ठाकूरद्वारला ठाकूरदास बुवांनी काळाराम देवळातच स्वामीपादुका पूजन करून मठ स्थापन केला व तो जगप्रसिद्ध झाला.