
घोटाळ्यातील 'त्या' पत्रावर आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची स्वाक्षरी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळा (Covid center scam) प्रकरणी आता महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त एसआयटीच्या रडारवर आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांच्या कंपनीला वर्क ऑर्डर दिल्याचे पत्र समोर आले आहे. या पत्रावर आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरी असल्याचीही माहिती मिळाली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात माहिती देत थेट वर्क ऑर्डरचे पत्र ट्विट केले आहे.
पुणे महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. तरीही मुंबई महानगरपालिकेने पाटकर यांच्या त्या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच तक्रारदेखील दाखल केली होती.
त्यानंतर काल पाटकर यांच्या घरी छापे टाकण्यात आले. दरम्यान सोमय्या यांनी जुलै २०२० मधील वर्क ऑर्डरची कॉपी ट्विट केली आहे. यावर आयुक्त इकबाल सिंग चहल तसेच अतिरिक्त आयुक्त या दोघांची स्वाक्षरी आहे, असे स्पष्ट दिसून येत आहे.
या घोटाळ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली आहे त्यांना लवकरच जेलमध्ये जावे लागणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला होता. तर आता या ट्विटमुळे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त रडारवर आले आहेत.
संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम दिले होते. पण त्यात मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. त्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला होता. हा तपास सुरू असतानाच ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून पाटकर यांना दणका दिला.
त्यानंतर ईडीने सुजीत पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित १० ठिकाणी छापेमारी केली. या सर्च ऑपरेशनमध्ये ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.