 
                            सिडनी : कोरोनाच्या लशीमुळे (corona vaccine) ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) मृत्यू झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. कोरोना लसीने हृदयाशी संबंधित आजार वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान डॉक्टरांच्या या दाव्याने शेन वॉर्नच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा आणि डॉ. ख्रिस नील म्हणाले की, वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांमध्ये कोरोनरी एथेरोस्क्लेरोसिस किंवा हृदयविकार दिसून आला. त्यांनी सांगितले की, त्यांचे संशोधन असे सूचित करते की कोविड एमआरएनए लस कोरोनरी रोगांचा जलद प्रसार करू शकते, विशेषत: अशा लोकांमध्ये ज्यांना आधीच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आहे.
डॉ. मल्होत्रा म्हणाले की, शेन वॉर्नचे वयाच्या ५२व्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणे हे खूपच असामान्य आहे. तसेच, आम्हाला माहिती आहे की, अलिकडच्या काळात वॉर्नची जीवनशैली निरोगी नव्हती. तो धूम्रपान करत असे. आणि त्याचे वजनही जास्त होते. माझ्या वडिलांचाही फायझर लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला आणि लसीनंतर त्यांचे हृदयविकार झपाट्याने वाढले.
डॉ. ख्रिस नील म्हणाले की, सर्व पुराव्यांचे समीक्षेने मूल्यांकन केल्यावर हे स्पष्ट झाले की कोविड लसींचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर केवळ मायोकार्डिटिस आणि पेरीकार्डिटिस किंवा जळजळ या प्रकारांपेक्षा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.

 
     
    




