- ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
‘भेटीलागी जीवा लागलीसे आस…’ असे गुणगुणत वारीसाठी वारकरी जसे भक्तिरसात न्हाऊन विठ्ठलदर्शनास निघतात. अगदी तसाच आनंदी, समाधानी, भक्तिमयी अनुभव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमधून साऱ्यांना देतात. त्यातील प्रत्येक दृष्टांतातून माऊली वाचकांना अगणित आनंद देतात. समाधान देतात. त्यामुळेच ‘ज्ञानेश्वरी’ हीसुद्धा एक वारीच आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
विठ्ठलऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽऽ
लाखो वारकऱ्यांची पंढरपूर वारी सुरू झाली आहे! ‘ज्ञानेश्वरी’ हीदेखील एक वारी आहे. त्यातील ओव्या वाचता वाचता भक्त कुठल्या कुठे पोहोचतो! विशेष म्हणजे त्यात अगणित आनंद सामावलेला आहे. अमृताप्रमाणे रसाळ वाणीने ज्ञानदेव साऱ्यांना ज्ञान आणि समाधान देतात.
ज्ञानेश्वर हे किती महान आहेत, हे यातील दाखल्यांवरून, त्यातील विविधतेतून, नाट्यातून जाणवतं. याचबरोबर ज्ञानदेवांकडे सूक्ष्म विनोदबुद्धी आहे, ती आपल्याला हसवते व मनाचा ठावही घेते. याचा अनुभव देणारी ओवी पाहूया. ही ओवी स्वतःचा धर्म पाळावा, हे सांगताना येते. ती ओवी अशी –
‘पण तोच दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर का त्याचे आचरण केले, तर पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होईल. (ते दुःखाला कारण होईल.)
येरा पराचारा बरविया। ऐसें होईल टेंकलया।
पायांचे चालणें डोइया। केलें जैसें ॥ ओवी क्र. ९३२
यात ‘पराचार म्हणजे दुसऱ्याचा धर्म, बरवा म्हणजे चांगला, तर टेंकलया म्हणजे आचरण केल्यास’ असा अर्थ आहे.
पायाने चालणं हे स्वाभाविक, नैसर्गिक आहे. पायाने हे काम नीट केल्यास माणूस हव्या त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचतो. याउलट डोक्याचं काम वेगळं आहे. उद्या कोणी म्हणेल मी डोक्याने चालतो तर…? तर ते अशक्य आहे. किती हास्यास्पद आहे! हा दृष्टांत देऊन स्वतःचा धर्म आचरावा हे तत्त्व ज्ञानदेव किती प्रभावीपणे बिंबवतात! त्याच वेळी चित्रही उभं करतात. जणू व्यंगचित्र!
पायाऐवजी डोक्याने चालणारा माणूस! हे चित्र श्रोत्यांच्या मनात उमटतं, त्यांना हसू फुटतं, नि मनोमन पटतं ज्ञानदेवांचं शिकवणं! म्हणजे आजच्या काळात बोलायचं झालं, तर ज्ञानदेव एक चांगलं व्यंगचित्र रेखाटतात. ते माणसांमधील व्यंग, दोष टिपतात, ते हसतखेळत दाखवतात व दूर करण्यासाठी प्रयत्नही करतात. त्याचबरोबर यात सूचकता आहे. पायाने चालून माणूस हव्या त्या स्थळी पोहोचतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य करून माणूस त्याच्या ध्येयापर्यंत जातो ही शिकवण यात आहे.
हे सर्व ते शिकवतात ते ‘माऊली’ म्हणून! कोणत्याही आईला वाटतं आपलं मूल सुधारावं, त्याला कोणी नाव ठेवू नये, ते चांगलं घडावं. त्याचप्रमाणे ज्ञानोबा माऊलींना वाटतं. या तळमळीपोटी ते भगवद्गीतेची शिकवण देतात. स्वाभाविक आई व मूल हा त्यांचा आवडता दृष्टांत आहे. ‘ज्ञानेश्वरी’त तो ठिकठिकाणी येतो.
स्व-धर्माचे महत्त्व सांगतानाही हा माय-मुलाचा दाखला येतो. त्यात माऊली म्हणतात, ‘आपली आई’ जरी कुरूप असली, तरी ज्या प्रेमामुळे आपण जगतो, ते तिचे प्रेम काही वाकडे नाही.’ ती ओवी अशी –
‘आणि आपुली माये। कुब्ज जरी आहे।
तरी जीजे तें नोहें। स्नेह कुर्हें की॥ ओवी क्र. ९२७
यातून सांगायचं आहे ‘आपला धर्म हा जणू आईप्रमाणे आहे. आई जरी कुरूप असली तरी तिचे प्रेम वाकडे नाही. त्याप्रमाणे आपला धर्म (कर्तव्य) आचरण्यास कठीण असेल तरी त्याचं आचरण करणं हे आपल्या हिताचं आहे. हे प्रत्येक माणसाने मनावर ठसवलं की, मी घरात व घराबाहेर माझा धर्म (म्हणजे कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक कर्तव्य) नीट पार पाडेन, तर समाजात सुख, शांती नांदेल. प्रत्येकाच्या ठिकाणी भरून राहिलेल्या परमेश्वराची प्रचीती येईल. तेव्हा,
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्हीं लोक॥
हा माऊलींचा अभंग सार्थ होईल.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra