Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीDarshana Pawar murder case : दर्शनाचा मारेकरी सापडला!

Darshana Pawar murder case : दर्शनाचा मारेकरी सापडला!

लग्नाला नकार मिळाल्याने केली हत्या

पुणे : एमपीएससी परिक्षेत (MPSC Exam) तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. तिच्यासोबत १२ जूनला ट्रेकींगला गेलेला राहुल हंडोरे (Rahul Handore) गायब होता व त्यानेच हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज होता. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अखेर मुंबईतून ताब्यात घेतले असून, त्यानेच दर्शनाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तपास सुरु असताना राहुल कबुली देत नव्हता तो वेगवेगळ्या राज्यात फिरत होता, मात्र पकडल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.

ट्रेकींगला जात असताना दोघेजण व परतताना एकटा राहुल असल्याचे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाले होते. त्यानंतर राहुल गायब झाला होता. त्यामुळे राहुलचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथकं नेमली होती. ही सगळी पथकं मुंबई, सिन्नर, लोणावळा, नाशिक आणि पुण्यात तपास करत होती. तपासादरम्यान राहुल आणि दर्शनाच्या फोन रेकॉर्डसमधून काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत होते. त्यांनी राहुलचं लोकेशन (Location) तपासण्याचा प्रयत्न केला. त्याचं पहिलं लोकेशन बंगळूरू, कोलकाता आणि त्याचं शेवटचं लोकेशन चंदीगडला दिसत होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तपासात राहुलच्या कुटुंबियांची मदत घेण्यात आली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये करत असलेल्या प्रवासासाठी त्याने घरच्यांकडे पैसे मागितले होते. त्याच्या घरच्यांनी त्याला सुरुवातीला पाच हजार, दीड हजार आणि पाचशे रुपये त्याच्या अकाऊंटवर पाठवले होते. तो ट्रेनने प्रवास करत असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याचा फोन सुरु होण्याची वाट बघत होते. अखेर खूप प्रयत्नांनंतर मुंबईतून राहुलला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलं.

काय आहे हत्येमागचं कारण ?

दर्शना पवार व राहुल हंडोरे आधीपासून एकमेकांना ओळखत होते व त्यांचे घरच्यांप्रमाणे संबंध होते. ते दोघेही एमपीएससीच्या परिक्षेसाठी प्रयत्न करत होते. दर्शनाला यात लवकर यश आले व एमपीएससी परिक्षेत उत्तीर्ण होऊन तिची वनअधिकारी म्हणून निवड झाली होती.

राहुलला दर्शनासोबत लग्न करायची इच्छा होती. परंतु दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न एका वेगळ्या मुलासोबत करायचे ठरवले होते व त्यासंबंधी हालचाली सुरु होत्या. राहुलने मला थोडा वेळ द्या, मीदेखील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होईन मग आम्ही लग्न करु, असे दर्शनाच्या घरच्यांना सांगून पाहिले. मात्र दर्शना व तिच्या कुटुंबियांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. याचाच राग येऊन राहुलने दर्शनाला ट्रेकिंगच्या निमित्ताने राजगडावर नेले व तिथेच तिची हत्या केली.

हत्येविरोधात दर्शनाचे कुटुंबीय व सकल मराठा समाज आक्रमक

दरम्यान, दर्शनाच्या हत्येप्रकरणी तिचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. राहुलने आमच्या मुलीची हत्या केली, त्यामुळे तो मेलाच पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा द्या अन्यथा आमच्या हवाली करा, आम्ही त्याला मारु, अशी आक्रमक भूमिका दर्शनाच्या आई व भावाने घेतली. तसेच सकल मराठा समाजानेदेखील या विरोधात आंदोलन पुकारले असून राहुलला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि या खटल्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -