Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजcovid center scam : मुंबई महानगरपालिका ईडीच्या विळख्यात!

covid center scam : मुंबई महानगरपालिका ईडीच्या विळख्यात!

मुख्यालयासह माजी सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल, रमाकांत बिरादार यांच्या घरी ईडीचे छापे

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि खासदार संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकर या दोघांच्याही घरी कालपासून ईडीचे धाड सत्र (ed raids) सुरु आहे. त्याचसोबत आज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह माजी सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल, पालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार आणि बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी यांच्या घरी सुद्धा ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. कोरोना काळातील कोविड घोटाळा (covid center scam) प्रकरणांमध्ये या धाडी टाकण्यात आल्या आहेत. ईडीला या सगळ्या छापेमारीतून नेमके काय हाती लागले? आणि यातून कोणाच्या अडचणी वाढणार? यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर टाकण्यात आलेल्या या धाडी राजकीय असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

विविध निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पदड्यामागची गणितं जुळवणारे ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाणांच्या चेंबूरमधील निवासस्थानी कालपासून छापेमारी सुरू आहे. तसेच सुजित पाटकरांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम या कंपनीला देण्यात आले होते. याच कंपनीने घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याप्रकरणी आता ईडीकडून चौकशी सुरु आहे.

या कोविड सेंटर घोटाळ्यामध्ये नेमकं सुरज चव्हाण आणि सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल यांचा या घोटाळ्याशी काय संबंध? आयएएस अधिकारी संजीव जैयस्वाल यांची ईडीने चौकशी का केली? यासारखे अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहेत.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस हॉस्पिटलच्या टेंडर बोलीच्या वेळी संजीव जैयस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि महत्त्वाचे म्हणजे ते स्थापन करण्यात आलेल्या समितीचा भाग होते. ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिले. टेंडर प्रक्रियेवेळी ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचे आहे, त्या कंपनीकडे पूर्वीचा अनुभव आणि पात्रता याचा विचार करून एक कंत्राट देणे क्रमप्राप्त होते. मात्र तपासात या कंपनीला पुरेसा अनुभव नसताना शिवाय या कंपनीकडे रुग्णसेवेसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध नसतानासुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आले, असे ईडीच्या तपासात निष्पण्ण झाले आहे.

आता संजीव जैयस्वाल यांनी असे असतानासुद्धा या कंपनीला कंत्राट का दिले? कोणाच्या सांगण्यावरुन दिले? कोणाचा दबाव होता का? त्यांचा या घोटाळ्यात सहभाग आहे का? याची ईडीकडून कसून चौकशी केली जात आहे. संजीव जैयस्वाल यांच्याशी संबंधित आणि या कंत्राट देण्याशी निगडीत असलेल्या अन्य काही पालिका अधिकारी यांच्या घरीसुद्धा छापेमारी करण्यात आली आहे.

ईडीने महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार आणि बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही छापे टाकले आहेत. जे केंद्रीय खरेदी विभागात होते, ज्यांनी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि इतर साहित्य पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी होते. गेल्या १२ तासांहून जास्त काळापासून त्यांची चौकशी सुरू आहे.

ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले. ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. या टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांची उल्लंघन झाले का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

कोरोना महामारीच्या काळात मुंबईत अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले. मुंबईतील दहिसर येथे असेच एक कोविड केंद्र स्थापन करण्यात आले होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे उद्योगपती सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधले असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यासाठी सुजित पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केली. ज्याला लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असे नाव देण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -