वृत्तसंस्था: समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे (Titanic) अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडीही (Titanic tourist submersible) अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. या पाणबुडीत एका नाविकासह इतर चार जणांचा समावेश आहे. टाईटन (Titan) असं या पाणबुडीचं नाव असून पाणबुडी समुद्रात गेल्यानंतर दोन तासांतच तिचा संपर्क तुटला आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी एजन्सीच्या पाणबुडीसह अमेरिका, कॅनडाच्या नेवी फोर्सकडून प्रयत्न केले जात आहेत.
ओशनगेट नामक कंपनीच्या या छोट्या पाणबुडीमध्ये पाच जण गेले होते. नाविकसह पाकिस्तानचे उद्योगपती प्रिन्स दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान आणि ब्रिटीश उद्योगपती हमिश हार्डिंग यांचा समावेश आहे. दरम्यान, टायटॅनिकच्या शोधासाठी निघालेल्या हार्डिंग यांनी जाण्याआधी सोशल मिडियावर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये ते म्हणाले, मला हे सांगताना अभिमान वाटतो की मी, टायटॅनिकच्या मोहिमेचा एक भाग आहे.
तसेच पाणबुडीच्या प्रवासाला गेलेल्यांपैकी प्रिंन्स दाऊद हे पाकिस्तानातील श्रीमंत कुटुंबापैकी एक आहेत. ते सेती (SETI) संस्थेचे विश्वसही आहेत. तर या पाणबुडीच्या पायलटचे नाव पॉल हेन्री असून तो फ्रान्सचा रहिवासी आहे. या पाणबुडीमध्ये प्रवास करण्यासाठी पर्यटकाला २ कोटी २८ लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. हा प्रवास न्यूफाउंडलंडमधील सेंट जॉन्सपासून सुरू होत असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
या पाणबुडीचे वजन १० हजार ४३२ किलो असून पाणबुडी १३ हजार १०० फूट खोलीपर्यंत पोहोचू शकते. या पाणबुडीमध्ये प्रवाशांसाठी ९६ तासांसाठीच ऑक्सिजन आहे.