Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Ashadhi Wari: विठू भक्तांसाठी आनंदाची बातमी! विठ्ठलाचे दर्शन घ्यायला आता केवळ लागणार इतके तास

Ashadhi Wari: विठू भक्तांसाठी आनंदाची बातमी! विठ्ठलाचे दर्शन घ्यायला आता केवळ लागणार इतके तास

पंढरपूर: विठ्ठल भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे! यंदा दर्शनाचा वेळ ७ ते ८ तासांनी कमी होणार आहे. यंदा प्रथमच विठ्ठलाच्या दर्शनाची रांग (Vitthal Darshan) वेगाने पुढे नेण्यासाठी दर्शन रांगेत प्रत्येक ५० मीटरवर निरीक्षक नेमण्याची योजना जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आणली आहे. आता यात्रा कालावधीत दर्शनाचा वेळ ७ ते ८ तासांनी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरु केला आहे. यामुळे यात्रा कालावधीत ३०-३० तास दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

विठुरायाची दर्शन रांग विठ्ठल मंदिरापासून (Vitthal Mandir) जवळपास ७ ते ८ किलोमीटर लांब जात असते. यातच दर्शन रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने भाविकांच्या दर्शनाचा वेळ लांबत जात असतो. याचा फटका वृद्ध भाविक, महिला आणि लहान मुलांना बसत असतो.

आता, यावर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण दर्शन रांगेत दर ५० मीटरवर निरीक्षक नेमून त्यांना बिनतारी यंत्रणा दिली जाणार आहे. एखाद्या ठिकाणी काही गडबड दिसून आल्यास तातडीने तिथे सुरक्षा रक्षकांमधील एक टीम पोचून घुसखोरी रोखेल. या व्यवस्थेमुळे दर्शनाची रांग न थांबता वेगाने पुढे पुढे जात राहील आणि यामुळे दर्शन रांगेतील भाविकांचा जवळपास सात ते आठ तासांचा वेळ कमी केला जाणार आहे.

याशिवाय पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याच व्हीआयपीला दर्शन मिळणार नाही. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्या व्हीआयपी मंडळींना पूर्णपणे पायबंद बसणार आहे. याचा फायदाही दर्शनाचा वेळ कमी होण्यात होणार आहे.

दरम्यान, आषाढी  यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले असून आता 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे.

Comments
Add Comment