न्यूयॉर्क: आज आंतराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिकेत योग दिन साजरा करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतरेस आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध देशातील राजदूत आणि नेते सहभागी होणार आहेत. साधारण ३ हजार राजदूत सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी योगसाधना करावी, असे आवाहन मोदींनी या वेळी केली. तसेच भारताने आवाहन केल्यानंतर जगातील १८० हून अधिक देशात योग दिन साजरा केला जात आहे.
योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले, २०१४ मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव आला तेव्हा विक्रमी संख्येने देशांनी त्याला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग ही जागतिक चळवळ बनली आहे.या वर्षी योग ओशन रिंग ऑफ योगाने या दिवसाला अधिक खास बनवले आहेत. याची कल्पना योगाचा विचार आणि समुद्राचा विस्तार यांच्यातील परस्पर संबंधांवर आधारित आहे.
Sharing my message on International Day of Yoga. https://t.co/4tGLQ7Jolo
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2023
आज जगभरातील लोक योग आणि वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर एकत्र येत योग करत आहेत. योगाद्वारे आपल्याला आरोग्य, आयुष आणि शक्ती मिळते असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे.आपल्यापैकी अनेक जणांना योगाची उर्जा जाणवली आहे. वैयक्तिक पातळीवर चांगले आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. योगामुळे सशक्त समाज निर्माण होतो. गेल्या काही वर्षांत स्वच्छ भारत ते स्टार्टअप यासारख्या गोष्टींमध्ये विलक्षण गती दिसली, या ऊर्जेचा परिणाम दिसून आला. भारताची संस्कृती असो वा सामाजिक रचना, अध्यात्म असो किंवा आपला दृष्टीकोन… आपण नेहमीच चांगल्या परंपरेचे स्वागत केले आहे. नवीन कल्पनांना स्वीकारले आहे.