
नाशिक (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठुमय झाले असून अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी बकरी ईदसुद्धा (Bakari Eid) साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा आदर्श निर्णय नाशिकच्या चांदोरी येथील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे, तर जळगावच्या अमळनेर शहरात तर यंदा कुर्बानीच दिली जाणारा नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुस्लीम बांधवांकडून घेण्यात आला आहे.
हरिनामाचा गजर करत दिंड्या पताका घेऊन पायी दिंडी सोहळा सुरू आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे. येत्या गुरुवारी २९ जून रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदा आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद येत आहे. त्यामुळे दोन सणांचा अनोखा संगम यानिमित्ताने होत आहे.
मात्र बकरी ईदला होत असलेली कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांकडून घेतला जात आहे. ईदनिमित्त सकाळी नमाज पठण करत त्या दिवशी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा निर्णय नाशिक जिल्ह्यातील सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील चांदोरी येथील सर्व मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.