Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकMegh Malhar : बळीराजाने मेघ मल्हार आळवून केला वरुण देवाचा धावा

Megh Malhar : बळीराजाने मेघ मल्हार आळवून केला वरुण देवाचा धावा

Megh Malhar : मृगाने दाखवल्या वाकुल्या, आर्द्राकडे नजरा खिळल्या

त्र्यंबकेश्वर : गेल्या आठ जून पासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने नाशिक जिल्ह्यात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी रोहिणी आणि मृग नक्षत्रात सरासरी पर्जन्य वृष्टी होत असल्याने या दिवसांत मशागत पूर्ण होऊन पेरणीची तयारी सुरु होत होती. तथापी, यंदा रोहिणी आणि मृग दोन्ही नक्षत्रांनी वाकुल्या दाखवल्याने मशागतही लांबली आणि पेरण्याही खोळंबल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मे, जून महिन्यात सरासरी १७० मिमी पाऊस पडतो. यावर्षी अवघा ३० मिमी पाऊस पडला आहे. आता २२ जून पासून सुरु होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राचा तरी पाऊस पडेल का, यावर गावागावात, पारांपारांवर चर्चा सुरु झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले की आर्द्रात पाऊस पडतो, असे मतही काही अनुभवी जाणकार मंडळी मांडू लागल्याने दोन – तीन दिवसांत पाऊस पडण्याची आशा पल्लवीत झाली आहे. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविल्याने आशेला धुमारे फुटत आहेत.

Megh Malhar : वरुण देवाची याचना…

पाऊस उशिरा येण्याची चिन्हे दिसू लागली की काही पूर्वापार उपाय योजना अंमलात आणण्याची प्रथा आजही ग्रामीण भागातून पहायला मिळते. नाशिक जिल्ह्यात देखील अनेक गावांमधून या जुन्या चालीरितींचा आधार घेण्यास सुरुवात झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्रंबकेश्वर मधील पवित्र कुंड कुशावर्त तीर्थात चिंतामणी सूमुहूर्तावर लवकरच विधान करून ठेवण्यात येणार आहे. तर एका जुन्या धार्मिक बाडात सापडलेल्या ग्रंथात पाऊस पडावा म्हणून काही वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला प्रार्थना मंत्र पठण करण्याचा विचार पुढे आला आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने वरुण देवाची आराधना करावी आणि लांबलेले पर्जन्यमान बोलवावे अशी धारणा प्रत्यक्षात आणण्याची मानसिकता अधोरेखित होऊ लागली आहे.

Megh Malhar : मेघ मल्हारची आळवणी…

  • पाऊस का पडत नाही, याविषयी आत्मपरीक्षणही सुरु झाले असून शासनाने आतापासूनच कृत्रिम पाऊस पाडण्या बाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत देखील व्यक्त होत आहे. ‘मेघ मल्हार’ हा राग आळवला की पाऊस पडतो, अशी एक धारणा आहे.
  • ‘तानसेन’ नावाच्या चित्रपटात सहगलसाठी ताना-रीरी या दोन बहिणी पाऊस पडावा म्हणून मल्हार गातात असे दृश्य चित्रीत आहे. त्या दृश्याने ही धारणा आणखी पक्व झाल्याने अनेकांना पर्जन्य राजाला बोलावण्यासाठी मेघ मल्हार आळवण्याचीही आठवण होऊ लागली आहे.
  • एकूणच नाशिक जिल्हा पावसासाठी आतुर झाला असून विविध मार्गांचा अवलंब करून पाऊस पडावा असेच प्रयत्न जिल्ह्यात सर्वदूर सुरु आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -