शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ज्या व्यक्तीला राखता आली नाही, ती व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. बाळासाहेबांचा मुलगा हे त्यांचे सध्याचे भांडवल आहे. त्यावर ते सध्या त्यांची राजकीय अस्तित्व टिकविण्याची स्पर्धा सुरू आहे. टोमणे मारत भाषणबाजी करणे ही त्यांची आता सवय महाराष्ट्रातील जनतेला माहीत झाली आहे. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देऊ लागले आहेत. म्हणे अमेरिकेला जाण्यापेक्षा मणिपूरचा दौरा करायला हवा होता. समोर शिल्लक सेनेचे कार्यकर्ते दिसल्यानंतर वरळी येथील शिबिरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यावर बोलून आपली हुशारी दाखवण्याचा तो प्रयत्न होता. आपली राष्ट्रीय राजकारणात किती पत आहे, हे भासविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याचे कारण पंतप्रधान मोदी यांच्या द्वेषाने पिछाडलेली केजरीवाल, नितीशकुमार यांच्यासह काही विरोधी पक्षांतील मंडळी आपल्याला मातोश्रीवर भेटायला येतात म्हणजे आपली पत वाढली असा भास सध्या त्यांना होत असावा. त्यामुळे आपणही मोदी यांच्याविरोधात काहीतरी बोललो, तर आपल्याला देशात इतर नेते विचारतील, असा समज त्यांनी बहुतेक करून घेतलेला दिसतो. त्यामुळे संविधानाने भाषणाचे स्वातंत्र्य दिले असले तरी, आपण कोणत्या विषयावर बोलतो याचे भान या नेत्यांनी ठेवायला हवे.
मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्वत: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मणिपूरचा दौरा करून दोन समाजामध्ये निर्माण झालेली तेढ मिटावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने बैठका घेतल्या. लष्कर, निमलष्करी जवान त्या ठिकाणी तैनात आहेत. मणिपूरचे राज्यपाल अनुसुया उइके यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने ५१ प्रतिष्ठित लोकांची शांतता कमिटी तयार करून समाजातील सर्व स्तरावर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न केले; परंतु मैतेई आणि कुकी समाजातील द्वेषभावना एवढी टोकाला गेली आहे की, तो काही एक ते दोन महिन्यांत निर्माण झालेला प्रश्न नाही, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर मणिपूरमधील हिंसाचार मिटविण्याचा प्रयत्न सुरू असताना, त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडण्यात काय अर्थ आहे. मणिपूर हे सीमेलगतचे राज्य आहे. म्यानमारमधून मणिपूरमध्ये अमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट गेले अनेक वर्षे चालविले जात होते. या रॅकेटचा पर्दाफाश मणिपूरमधील विद्यमान भाजप सरकारने केल्यानंतर असामाजिक तत्त्वाची मंडळी सरकारवर नाराज होती. त्यात या दोन समाजातील वादाचा फायदा आणखी कोणी अदृश्य स्वरूपात घेत असावा, असा संशय स्थानिक पातळीवर व्यक्त केला जात आहे; परंतु हिंसेला जात आणि धर्म नसतो. तसेच विवेकाची पातळी सोडलेल्या जमावाला आवरण्यासाठी थोडा वेळ लागतोच. दंगली पेटविणाऱ्या १० हून अधिक अतिरेकी गटाच्या व्यक्तींना यमसदनी पाठविले आहे; परंतु हे दंगेखोर सर्वसामान्य माणसांच्या आडून दंगल पेटविण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्याचे केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारकडून काम केले जात आहे. सरकारी पातळीवर, युद्धपातळीवर हा हिंसाचार रोखण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असल्याने आता अतिरेकी गटाकडून केंद्रीय विदेश राज्यमंत्री तसेच मणिपूर सरकारमधील मंत्री यांच्या घरांना टार्गेट केले जात आहे. मात्र या हिंसाचाराचा आधार घेत विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेतच; परंतु आजच्या घडीला त्यांना जगभरात मिळणारा मानसन्मान पाहता, ‘टुकडे टुकडे गँग’चे समर्थन करणाऱ्या काँग्रेसपासून काही डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यात आता उबाठा सेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याची संधी शोधली आहे. आपण कोणावर टीका करीत आहोत आणि आपली उंची किती याचे भान उबाठा सेनेने ठेवायला हवे. पंतप्रधान मोदी यांचा अमेरिकेचा दौरा हा काही आज ठरलेला नाही. अमेरिकेसारख्या प्रगत राज्याच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर होणाऱ्या चर्चेसाठीच्या दौऱ्याचे नियोजन आधी झालेले असते. कोणत्या विषयावर चर्चा होणार, त्यात दोन देशांमधील परस्पर संबंध आणि व्यापारसंबंध वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने उचललेले ते पाऊल याचा समावेश असतो. त्यामुळे पंतप्रधानांनी आधी मणिपूरला जावे असा सल्ला देण्याची आपली कुवत आहे का? हे उबाठा सेनेने ओळखावे. महाराष्ट्रात अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय काम केले हे आधी सांगावे. ‘मातोश्री’मध्ये बसून राज्याचा कारभार चालवला. मंत्रालयात सर्वसामान्य जनता आपले प्रश्न घेऊन येते. पण, मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात कोणी पाहिले आहे का, असा प्रश्न जनताच त्यावेळी विचारत होती. ज्या नेत्याला स्वत:चे आमदार, खासदार नव्हे तर नगरसेवक, पक्षातील पदाधिकारी टिकवता आले नाहीत, त्यांनी पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यावर बोलणे हे हास्यास्पद वाटते. ज्या बाळासाहेबांनी पक्ष वाढवला त्या शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्य बाण चिन्ह ज्या नेत्याला राखता आले नाही त्यांनी पंतप्रधानांवर टीका करताना जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी.