पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इगतपुरी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी पो. सामुंडी येथील सर्वहरा परिवर्तन केंद्र या ठिकाणी असलेल्या शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींना बळजबरीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक, रा. राणेनगर, नाशिक आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात मुलींच्या पालकांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षिका माधुरी गवळी मुलींना छडीने मारहाण करून दमदाटी व जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. ह्या धक्कादायक प्रकारामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेचा संपूर्ण तपास नाशिक ग्रामीणचे उपअधिक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील व हवालदार खांदवे करीत आहेत .
एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला बाल हक्क आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या वर्षा पासुन मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. शाळा चालु होण्यासाठी पंधरा दिवस बाकी असतानाच वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे २०२३ पासूनच प्रवेश देण्यात आला. सुटीत मुलींना पारंपरिक नृत्य व संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात मुलींना संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला.
संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी ३,५०० रुपये अनामत रक्कम जमा केली. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून, तेथे मे महिन्याच्या सुट्टीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या पर्यटकांसमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तर शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली होती.
वसतिगृहाच्या शिक्षिका मुलींना पारंपरिक नृत्य शिकवत असताना पर्यटक ते पाहत असतील. आम्ही मुलींना कोणत्याही प्रकारे इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही, असा दावा एका शिक्षकाने केला.