कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणार – प्रकाश मुथा
कल्याण : भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश मुथा यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंटकच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले.
यावेळी इंटकचे प्रदेश महासचिव राजन भोसले, काँग्रेस नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा, डॉ. डी. एस. पालीवाल, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जयनारायण पंडित, कमलादेवी महाविद्यालयाचे अध्यक्ष सदानंद तिवारी, संदीप नहरी, जयदीप सानप, राजा जाधव, युवानेता अविनाश मुथा, माया कटारिया यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकाश मुथा यांची नुकतीच इंटकची महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून प्रदेश कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मुथा यांनी उपस्थितांशी संवाद साधला. इंटकच्या माध्यमातून गोरगरीब कामगार आणि मजुरांच्या समस्या सोडविण्यात येतील. संघटनेत नागरिकांना सहभागी करण्याला प्राधान्य देणार असून सर्वांच्या सहकार्याने संघटना मजबूत करणार असल्याचे यावेळी प्रकाश मुथा यांनी सांगितले.