शाखाप्रमुखांसह माजी नगरसेवकांना पाठवल्या नोटिसा
मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करुन नवी शिवसेना (Shivsena) स्थापन केली त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ‘स्वाभिमान दिन’ (Swabhiman din) साजरा करणार आहे, तर ठाकरे गटाने हा दिवस ‘जागतिक खोके दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला हानी पोहोचू नये याकरता मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या खोके दिनाला प्रतिबंध केला आहे. तशा नोटिसाच ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांसह माजी नगरसेवकांना व पदाधिका-यांना पाठवण्यात आल्या आहेत.
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केलं, त्यामुळे शिवसेनेत फूट पडली तरी खरा शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली तयार झाला. त्यानिमित्त शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे आणि ठाकरे गट हा दिवस जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. ठाकरे गटाच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी तसे आदेश दिले होते. मात्र अशाप्रकारे कुठलाही दिन साजरा करण्यास ठाकरे गटाला मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. असा दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सूचना या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस २० जून गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. यासंबंधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ठाकरे गटाच्या तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर तशाप्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र, यालाही पोलिसांनी प्रतिबंध केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन व्हावे याकरता पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे.
ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, दक्षिण मुंबईमध्ये खोके दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra