
SIT investigation : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून (SIT investigation) अनेकांचा बुरखा फाटणार आहे आणि अनेक नागडे होणार आहेत, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरेंचा आक्रोश मी समजू शकतो. त्यांच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिकेत १२ हजार ५०० कोटींचा जो भ्रष्टाचार झाला, त्यावर कॅगने ताशेरे ओढले. त्यावर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्या चौकशीतून अनेकांचे बुरखे फाटणार आहेत आणि अनेक जण नागडे सुद्धा होतील. उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादात जी गँग काम करीत होती, त्या गँगचे आता काही खरे नाही, असे त्यांना वाटत असल्याने, त्यांचा आक्रोश स्वाभाविक आहे. या आक्रोशातून त्यांनी केलेल्या विधानावर काय प्रतिक्रिया द्यायची, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई महापालिकेवर मोर्चा हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, दुसरे काही नाही. प्रकाश आंबेडकर हे ठाकरे गटासोबत युतीत आहेत आणि ते औरंगजेबाच्या मजारीवर जातात. औरंगजेबाचे महीमामंडन करतात, त्याला उद्धव ठाकरेंचे समर्थन आहे का? काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन त्यांना या सार्या बाबी आता चांगल्या वाटत असतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.