
आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा देशद्रोही या दिवशी जन्माला आला : नितेश राणे
मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) २७ जुलै हा उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस 'देशद्रोही दिन' म्हणून साजरा करण्याची मागणी आज सकाळी ट्विटद्वारे केली आहे. तसेच ही मागणी करणारा एक व्हिडीओदेखाल त्यांनी समाजमाध्यमांवर (Social Media) शेअर केला आहे. आजवर पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या सर्वात मोठ्या गद्दारांपैकी एक गद्दार या दिवशी जन्माला आला, यामुळे या दिवसाला 'देशद्रोही दिन' म्हटले जावे, अशी खळबळजनक मागणी नितेश राणेंनी केली आहे.
नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कृपया २७ जुलै हा 'देशद्रोही दिवस' म्हणून घोषित करा. आजवर पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या सर्वात मोठ्या गद्दारांपैकी एक या दिवशी जन्माला आला. महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्ती असलेल्या आपल्याच वडिलांच्या पाठीत त्याने वार केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याच्या आपल्या घाणेरड्या महत्त्वाकांक्षेसाठी त्याने भाजपसारख्या जवळच्या मित्राच्या पाठीत आणि स्वतःच्या धर्मावर वार केले. त्याने मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भ्रष्टाचार करून करोडो पैसे कमवले. म्हणून मी २७ जुलै हा दिवस देशद्रोही दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन करत आहे, जेणेकरुन अख्ख्या जगाला त्याची आठवण होईल आणि त्याला दररोज शाप दिले जातील.
PUBLIC DEMAND!@UN@antonioguterres@UNinIndia @PMOIndia @UNICEFIndia @ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @unfoundation @UNHumanRights@rautsanjay61
Pls declare 27 July as “TRAITOR DAY” . One of the biggest traitor ever seen or experienced was born on this day . He…
— nitesh rane (@NiteshNRane) June 20, 2023
ठाकरे गट साजरा करणार होता खोके दिन
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करुन नवी शिवसेना (Shivsena) स्थापन केली त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना 'स्वाभिमान दिन' (Swabhiman din) साजरा करणार आहे, तर ठाकरे गटाने हा दिवस 'जागतिक खोके दिन' म्हणून साजरा करायचे ठरवले आहे.
मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला हानी पोहोचू नये याकरता मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या खोके दिनाला प्रतिबंध करुन त्यांचा मानस हाणून पाडला आहे. तशा नोटिसाच ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांसह माजी नगरसेवकांना व पदाधिका-यांना पाठवण्यात आल्या आहेत. याचाच पाठपुरावा करत २७ जुलै 'देशद्रोही दिन' म्हणून घोषित करण्याची नवी मागणी करुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.