
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची
ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरी (Biometric attendance) सक्तीची केली जाणार आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयात या पूर्वीच बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आल्याने त्या ठिकाणी कर्मचारी वर्गास कार्यालयात वेळेवर हजर राहण्याबाबत शिस्तीचा धडा मिळाला आहे. त्याप्रमाणे शिवाजी छत्रपती रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी डॉक्टर आदींना शिस्त लागावी, यासाठी फेसरिडिंग बायोमेट्रिक हजेरी मशीन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठामपा आरोग्य विभागाचे उपायुक्त पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले उपायुक्त उमेश बिरारी यांनी अचानक कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांना अनेक बाबी निदर्शनास आल्यावर त्यांनी ढासळलेला कारभार शिस्तबद्धपणे सुरू राहण्यासाठी आयुक्तांच्या पावलावर पाऊल टाकत तातडीने फेसरिडिंग बायोमेट्रिक हजेरी मशिन बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही बदल देखील त्यांनी सुचविले आहेत. त्याची कामे सुरू झालेली आहेत. ४५० बेड्स असलेल्या कळवा रुग्णालयात दररोज १५०० हून अधिक रुग्ण हे ओपीडीवर येत असतात. प्रसूती कक्षांप्रमाणे इतर कक्षही फुल्ल असल्याचे दिसत आहेत. या ठिकाणी रोजच्या रोज विविध स्वरूपाच्या १० ते १५ सर्जरी होत असतात. त्यातच ठाणे जिल्हा रुग्णालयाचे स्थंलातर झाल्याने कळत नकळत त्याचा भार हा कोरोनापासून कळवा रुग्णालयावर येताना दिसत आहे. तरीसुद्धा आजही रुग्णालयातील काही कर्मचारी अचानक कामावरून गायब झाल्याचे पहिल्याच रुग्णालय भेटीत महापालिकेत नव्याने आलेले उपायुक्त उमेश बिरारी यांच्या प्रखरतेने निर्दशनास आले आहे. यामध्ये वॉर्ड बॉय असो परिचारिका तसेच डॉक्टर यांचाही समावेश आहे. त्यातही काही कर्मचारी सुट्टीवर असल्याचे निदर्शनास आले. याच बरोबरीने काही ठिकाणी रुग्णालयाच्या भिंतीचे प्लास्टर पडल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याची डागडुजी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कर्मचाऱ्यांना वेळीच शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेत, त्या दृष्टीने पावले टाकण्यास तत्काळ सुरुवात केली आहे.