Monday, March 17, 2025
Homeसंपादकीयविशेष लेख‘मन तरसे मेघ बरसे आषाढस्य प्रथम दिवसे’...

‘मन तरसे मेघ बरसे आषाढस्य प्रथम दिवसे’…

  • ह. भ. प. डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर, मुंबई

आषाढ म्हटलं की, आठवतो तो काळ्या ढगांमधून घनघोर गर्जना करत बरसणारा पाऊस… आणि… त्याचबरोबर महाकवी कालिदास यांचे स्मरण झाले नाही तरच आश्चर्य. त्यांच्या अजरामर साहित्य कृतील माझे अत्यंत आवडते नाटक अभिज्ञान शाकुंतलंम् आणि जगभरातील साहित्यिकांच्या मानस भुरळ घालणारे त्यांचे अलौकिक खंडकाव्य मेघदूतम्… अवघ्या विश्वाला मोहीत करून गेले! त्यातील काव्याचा रसास्वाद अनेक मोठमोठ्या साहित्यिक मंडळींना देखील आकर्षित करून गेला.

भारतीय मनाला नेहमीच प्रफुल्लित करणारे हे खंडकाव्य. महाकवी कालिदास यांचे मेघदूत ही संस्कृत साहित्यातील एक अजरामर कलाकृती आहे. मंदाक्रांता सारखे वृत्त, वेधक स्थळचित्र आणि त्या पार्श्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची शैली अत्यंत मनभवान, मनमोहक आहे… एका यक्षाला त्याच्या कर्तव्यचुकीमुळे यक्षराज कुबेर, एक वर्षाची हदपारीचा शाप (शिक्षा) देतो आणि आज्ञा देतो अलका नगरीपासून लांब अशा रामगिरी पर्वतावर राहण्याची. विरहात तळमळणारा हा यक्ष आकाशातल्या मेघाला पाहतो आणि त्याला दूत बनवून आपल्या पत्नीला निरोप पाठवतो. अशी रंजक कथा! रामगिरीपासून ते अलकानगरीपर्यंत जाताना लागणारे अवंती देश, विदिशा नगरी, ब्रह्मवर्त, कुरुक्षेत्र, गंगोत्री, दिमधवल पर्वत, त्यातील लागणारी नगरे आणि निसर्ग ह्याचे वर्णन तो मेघाला विस्तृतपणे सांगतो. अशी ही मेघदूतातली काव्यकल्पना!!!
जसे आजकाल आधुनिक काळातसुद्धा ही नवीन पिढी आपले महत्त्वाचे msg, डेटा, गुगल, site, cloud मध्ये save करतात. मग कालिदासाच्या प्रतिभेतून साकार झालेली ही बहारदार कल्पना मेघदूतात(Cloud) मध्ये ‘सेव्ह’ झाली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही!

महाकवी कालिदास याच्या मेघदूत या खंडकाव्यातील मूळ कल्पना अशी आहे की, आपल्या प्रियेपासून वर्षभरासाठी दूर जावे लागलेला कुबेर सेवक यक्ष तिला मेघदूतामार्फत संदेश पाठवत आहे, अशी रोमँटिक कल्पना या काव्याच्या केंद्रस्थानी आहे. रामगिरीच्या आश्रमातून आषाढाच्या पहिल्या दिवशी गिरिशिखरावर दिसलेल्या मेघाला तो आवाहन करतो आणि आपल्या प्रियेला निरोप देण्यासाठी गळ घालतो, अशी ही रम्य सुंदर कल्पना!! प्रियेकडे कोणत्या मार्गाने जावे, जाताना वाटेत काय काय दृष्टीस पडेल याचेही वर्णन करतो आणि कैलास पर्वताजवळच्या अलकापुरीत पोहोचल्यावर प्रियेला आपली खूण पटवून काय संदेश द्यावा याचेही विवरण करतो. ‘मंदाक्रांता’ वृत्तातील १२० चतुष्पदींचे हे छोटेखानी काव्य प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे आणि विरहार्त प्रणयभावना यांचा त्रिवेणी संगम साधते. आतील स्थलचित्रणांची वास्तवता आजही रसिकांना मुग्ध करते. आपण जर का विमानातून मेघदूताच्या मार्गाने प्रवास केला तर… कालिदासाने केलेल्या स्थलवर्णनांची अचूकता लक्षात येते. मेघदूताचे मराठीत भाषांतर, अनुवाद करणे हे आपल्या काव्यप्रतिभेला आव्हान आहे, असे प्रत्येक संस्कृतच्या जाणकार कवीला वाटले. त्यामुळे मराठीत मेघदूताचे वीस-बावीस अनुवाद उपलब्ध आहेत. कविवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, माधव जूलियन, बा. भ. बोरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ कवींनीही मेघदूतला मराठी रूप दिले आहे. तसेच अनेक संस्कृत पंडितांनीही ‘मेघदूता’च्या निमित्ताने आपल्या काव्यरचनेचा कस अजमावून पाहिला आहे. इ. स. १९९४ मध्ये शांता शेळके यांनी एके दिवशी सहजपणे मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचे मराठीकरण सुरू केले आणि संपूर्ण मेघदूताचा अनुवाद केल्यावरच त्या थांबल्या. ह्यालाच का मेघदूत व कालिदासची भुरळ म्हणावे !!

कॉलेजमध्ये असताना मलाही श्लोक मनात घोळवत राहण्याचा या मेघदूताने छंदच जडवला होता जणू !! मेघदूतातील २० व्या वर्षी पाठ केलेला पहिला श्लोक या लेखप्रपंचामुळे चक्क अनेक वर्षानंतर आठवला !! बोथट झालेल्या बुद्धीला चालना देणारे असे हे मनोवेधक कल्पनाप्रधान मेघदूत काव्य आहे त्याचा पहिला श्लोक असा…

कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत: शापेनास्तग्ड:मितमहिमा वर्षभोग्येण भर्तु:।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपूण्योदकेशु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं ‘रामगिर्याश्रमेषु ’।।
आता तुम्हास प्रश्न पडेल की, ‘आषाढास्य प्रथम दिवसे’ ही ओळ यात कुठे आहे?

मेघदूताच्या ‘पूर्वमेघ’ या भागातल्या दुसऱ्या कडव्याची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या तीन शब्दांनी होते. ती ओळ खूपच प्रसिद्ध झाली आहे; मात्र ते संपूर्ण कडवं अनेकांना माहिती नाही. पण पूर्वी कधीतरी केलेले पाठांतर असे वाया जात नाही याचा आज मला प्रत्यय आला. ते मूळ संपूर्ण कडवं आणि त्याचे काही प्रसिद्ध साहित्यिकांनी केलेले व मला आवडलेले अनुवाद सांगितल्या वाचून राहावत नाही! मूळ संस्कृत काव्यपंक्ती –

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ:।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं ।
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।
कवी कुसुमाग्रज भावानुवाद करताना म्हणतात की,
प्रेमी कान्ता-विरहिं अचलीं घालवी मास कांहीं
गेलें खालीं सरुनि वलय स्वर्ण हस्तीं न राही
आषाढाच्या प्रथम दिनिं तो मेघ शैलाग्रिं पाहे,
दन्ताघातें तटिं गज कुणी भव्यसा खेळताहे ।
(कुसुमाग्रज)

तसेच याच ओळी कविवर्य बा. भ. बोरकरांना अशा भावल्या की…
आषाढाच्या प्रथम दिवशी, बघे रम्यशा ढगा
दंताघाती समद गजसा, देखणा मेघ देखे
(बा. भ. बोरकर)

शांताबाई शेळके यांनाही या ओळी वयाच्या ७० व्या वर्षी अतिशय आकर्षित करून गेल्या! त्या म्हणतात, “आषाढाच्या पहिल्या दिवशी बघ तो शिखरी मेघ वांकला टक्कर देण्या तर भिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला!” म्हणूनच तर अनुवाद करून बघणे हा मूळ कलाकृत्तीचा अधिक उत्कटपणे रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग कित्येक साहित्यिकांना अनुभवला!

कवी कुलगुरू कालिदासाने स्वतःबद्दल कांहीच लिहून ठेवलेले नसल्यामुळे, त्यांच्या चरित्राबद्दल विश्वसनीय अशी माहिती कमी आणि कपोलकल्पित आख्यायिकाच जास्त प्रचलित आहेत. त्यांचा जीवनकाल नक्की केव्हा होता यावर एकमत नाही. तो विक्रमादित्य राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता असे सर्वश्रुत आहे. त्यामुळे महाकवी कालिदास नेमका कुठे आणि कोणत्या काळात होऊन गेला हे सांगणे कठीण आहे. तो उज्जयनी येथील विक्रमादित्य राजाच्या दरबारात होता असे बहुतेक लोक मानतात. संस्कृत आणि भारतीय भाषांमधील वाङ्मयातील अनेक साहित्य कृतींमध्ये कालिदासाच्या रचनांचा उल्लेख सापडतो. अशा प्रकारे तर्क करून त्यांचा जन्म दिवस आषाढाचा प्रथम दिवस मानला गेला आहे. त्यालाच ‘कालिदास दिन’ म्हटले जाते! आज कवी कुलगुरू कालिदास महती सांगणारा हा प्रसिद्ध श्लोक मला सांगावासा वाटतो..

पुरा कविनां गणनाप्रसंगे ।
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः
अद्यापितत्तुल्यकवेर्अभावात् ।

अनामिका सार्थवती बभूव । म्हणून आज आषाढ शुक्ल प्रतिपदा, आषाढ महिन्याचा पहिला दिवस ग्रीष्म समाप्ती ऋतू काळ प्रेमीजनास प्रिय काळ !! या ऋतूवर आधारित अनेक शास्त्रीय बंदिशी, राग मेघमल्हार “छायी घटा घनघोर मेघा बरसे चाहुओर” तसेच चित्रपटगीते, “घन घन मला नभी दाटल्या कोसळती धारा “, “काली घटा छाये मोरा जिया घाबरये”, बरसो रे मेघा “इ .

हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून संपूर्ण भारतभर स्मरणपूर्वक साजरा केला जातो. मेघदुतातील रामगिरीच्या वर्णनानुसार आजचे ते रामटेक आहे म्हणून रामटेकच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे कालिदासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे व कालिदास विद्यापीठ देखील स्थापन केले आहे. संस्कृत भाषेतील आपल्या अतुलनीय काव्यरचनांनी रसिकांच्या मनास मोहित करून, अधिराज्य गाजवणाऱ्या संस्कृत महाकवी कुलगुरू कालिदास यांच्या काव्यप्रतिभेस त्रिवार वंदन…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -