कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे आज (सोमवारी) निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तब्बल सात दशके त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले. त्यानंतर उतरत्या वयामुळे त्या अभिनय क्षेत्रापासून काहीशा दूर झाल्या. त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या. त्या अलीकडेच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी, दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.
घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले होते, असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते.