
मुंबई महापालिका घोटाळ्याचा तपास एसआयटी मार्फत
कल्याणात मोदी @९ सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आरोप
कल्याण : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या वेळी काँग्रेस सोबत जाणार नाही असे त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते. खुर्ची साठी, मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात. महाराष्ट्रात पहिली गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली. दुसऱ्यांना गद्दार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नसल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मुंबई महानगरपालिका घोटाळ्याचा तपास एसआयटी मार्फत करणार असल्याचा उल्लेख देखील यावेळी त्यांनी केला. मोदी@९ महा जनसंपर्क अभियान अंतर्गत कल्याणच्या फडके मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले होते त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र राज्य भाजपा प्रभारी सी. टी. रवी, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदींसह इतर अनेक मान्यवर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीला आज शिवसेनेचा वर्धापनदिन त्यानिमित्ताने बाळासाहेबांना वंदन तर एकनाथ शिंदे यांना वर्धपान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत वर्धापनदिनचाचे दोन कार्यक्रम असून एक ज्यांनी शिवसेना वाचवली त्यांचा तर दुसरा ज्यांनी शिवसेना बुडवली त्यांचा. भाजपा शिवसेनेच्या युतीला पूर्ण बहुमत दिलं होतं. उद्धव यांनी त्यावेळी युतीसाठी मतं मागितली मात्र निवडणूक झाली आणि नियत फिरली, खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. पहिली गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्या सोबत मतं मागीतिली त्यांच्या सोबत आले.
आज त्यांची अवस्था संताजी धनाजी सारखी असून मोदी शहांचे नाव घेतलं की उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसची हीच अवस्था आहे. त्यांना जळी स्थळी मोदी अमित शहा दिसतात. मोदींनी लाल चौकात तिरंगा लावला. मोदी सीमेवर जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. तुम्ही सैनिक सोडा वरळीत शिवसैनिकांना सुद्धा भेटत नाहीत. अडीच वर्षे कुंभकरणाचे होते. अडीच वर्षात मुख्यमंत्री फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले असं शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं. सूर्याकडे थुंकल्यास थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते तसेच मोदींवर थुंकू नका.
एमएमआरडीए क्षेत्रांत जेवढी कामं आम्ही केली तेवढी कोणी केली नाही. अडीच वर्षात एकही काम महाविकास आघाडीने केलं नाही. त्यांनी थांबवलेल्या मेट्रो, बुलेट ट्रेन, अलिबाग विरार कॉरीडॉरचं काम आम्ही सुरू केलं. मोदींनी महाराष्ट्राला कोविडची लस दिली. 18 कोटी लस महाराष्ट्राला दिल्या. मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्राला दिला. जगात भारताचा सन्मान मोदींमुळे असून 120 देशांच्या प्रमुखांनी मोदींना त्यांचे नेते होण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना 6 हजार दिले, महिलांना एसटी त 50 टक्के सूट दिली. 10 लाख घरे ओबीसींना बांधण्याचा निर्णय घेतला. जलयुक्त शिवार, सामान्य माणसाला 5 लाखांचं विमा कवच दिलं सगळे ऑपरेशन फ्री करण्याचा निर्णय घेतला. मोदींनी भारताला अशा ठिकाणी नेलं आहे जिथे सर्वाना हेवा वाटत आहे. पुढचे 5 वर्षे मोदींना दिली तर जगात भारत अववल होईल असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.
तर खरा मेळावा हा एकनाथ शिंदेंचाच असून हिंदुत्वाच्या विचारांना झुगारून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेल्याने त्यांचे दुकान बंद झाले असल्याची टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.