स्थानिक कोळी बांधवांची मागणी
वसई-विरार : मागील अनेक वर्षांपासून विरार येथील अर्नाळा जेट्टीचे काम रखडलेले आहे. सद्यस्थितीत या जेट्टीचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, मात्र नव्याने बांधलेल्या या जेट्टीच्या काही भागातील सिमेंट निखळू लागले आहे, त्यामुळे अर्नाळा जेट्टीची सुरक्षा तपासवी, अशी मागणी येथील स्थानिक कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे़
विरार पश्चिमेस अर्नाळा किल्ला हे बेट आहे. या भागातील नागरिकांना बोटीनेच प्रवास करावा लागतो. किनाऱ्यावर जेट्टी नसल्याने येथील रहिवाशांना गुडघाभर पाण्यात बोट थांबवून पाण्यात उतरून मार्गक्रमण करावे लागते. या अडचणीच्या व धोकादायक प्रवासातून स्थानिकांची सुटका व्हावी, यासाठी या भागात मेरिटाइम बोर्डाने जेट्टी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, या जेट्टीच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
२०१७ पासून या जेट्टीचे काम सुरू आहे. यासाठी अर्नाळा किनाऱ्यावर सुमारे १६ कोटी व अर्नाळा किल्ल्याच्या बाजूने १० कोटी असा निधी मंजूर करण्यात आला होता. २०१९ मध्ये जेट्टीचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. हे काम सुरू होऊन जवळपास पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला असून, या जेट्टीचे ९० टक्क्यांच्या आसपास काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे आजही येथील नागरिकांना गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन बोटीतून चढ-उतार करून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
मात्र या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या जेट्टीच्या काही भागातील सिमेंट निखळू लागल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. अवघ्या काही वर्षांत या जेट्टीची अशी अवस्था असेल, तर पुढे ही जेट्टी किती वर्षे तग धरून उभी राहील?, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. या जेट्टीचे काम योग्य पद्धतीने करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या जेट्टीचे सुरक्षा ऑडिट व्हायला हवे, अशी आग्रही मागणीही स्थानिक कोळी बांधवांनी केली आहे.