- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
आपण आपल्या मागील काही लेखांत सांगितल्याप्रमाणे आता शेअर बाजाराच्या पुढील वाटचालीचा अंदाज बांधत असताना एक गोष्ट गुंतवणूकदारांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शेअर बाजाराचे पीई गुणोत्तर. सध्या पीई गुणोत्तर खूप जास्त आहे. शेअर बाजार हा आज जरी टेक्निकल बाबतीत नक्कीच तेजीत आहे. मात्र फंडामेंटल बाबतीत पी.ई गुणोत्तरासह अनेक मूलभूत गुणोत्तरे ही अत्यंत धोकादायक पातळी जवळ आलेली आहेत. त्यामुळे शेअर बाजाराचे फंडामेंटलनुसार मूल्यांकन जोपर्यंत स्वस्त होत नाही तोपर्यंत गुंतवणूक करीत असताना योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक करीत असताना सर्वच्या सर्व गुंतवणूक एकाच शेअर्समध्ये करू नये. पैशाचे योग्य विभाजन आणि व्यवस्थापन करून त्यानुसार टप्प्याटप्प्याने शेअर खरेदी करावी. गुंतवणूक करीत असताना गुंतवणुकीचा कालावधी ठरवणे अत्यंत आवश्यक आहे. दीर्घमुदतीची गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर असते मात्र सध्या असलेले निर्देशांकांचे असलेले पीई गुणोत्तर पहाता अल्पमुदतीच्या गुंतवणुकीचाच विचार करणे योग्य ठरेल. शेअर्स खरेदी-विक्री करीत असताना स्टॉपलॉसचा वापर करणे आवश्यक आहे. सध्या मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल.
अल्पमुदतीसाठी करुर वैश्य बँक, एचएएल, अपटेक यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. मी माझ्या मागील २९ मेच्या लेखात अल्पमुदतीचा विचार करता ‘जस्ट डायल’ या शेअरने ६८५ अत्यंत महत्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली असून आज ७०५ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होवू शकेल हे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर या शेअरने ७९ हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पहावयाचे झाल्यास या शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ झालेली आहे. अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा मंदीची असून सोने ६०००० ते ५८६०० या पातळीत आहे.
अल्पमुदतीच्या चार्टनुसार सोन्यामध्ये जरी मंदीची असली तरी मागील काही महिन्यांत झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आता सोन्यात वाढ होणे अपेक्षित आहे. कच्च्या तेलात मागील आठवड्यात वाढ झालेली आहे. आता चार्टनुसार जोपर्यंत कच्चे तेल ५५०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलात मोठी घसरण होणार नाही.
निर्देशांकात ऑप्शन प्रकारात जोखीम घेण्याची क्षमता असणाऱ्यांना या महिन्याची एक्सपायरी असणाऱ्या ‘पुट ऑप्शन’ प्रकारात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. मात्र ऑप्शन प्रकारात ट्रेड करीत असताना त्यातील धोके लक्षात घेऊन गुंतवणूक करता येईल. सध्या निर्देशांकाची दिशा तेजीचीच असून खूप मोठ्या वाढीनंतर करेक्शन अपेक्षित आहे. त्यामुळे ऑप्शन प्रकारात जोखीम घेऊ शकत असलेल्यांना हा कॉंट्रा ट्रेड घेता येवू शकतो. पण यामध्ये मुख्य ट्रेंडच्या विरोधी गुंतवणूक असल्याने कमीत कमी जोखीम घेणे गरजेचे आहे. पुढील आठवड्यासाठी निफ्टीची १८५०० ही खरेदीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)