काठमांडू:‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. नेपाळची राजधानी काठमांडू महानगरपालिकेने काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांवर आजपासून बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. सीतेवरील तो वादग्रस्त संवाद काढून टाकल्याशिवाय चित्रपट प्रदर्शानाची परवानगी देण्यात येणार नाही असं काठमांडूच्या महापौरांनी म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटावर होणाऱ्या टीकेमुळे दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४०टक्के घट झाली आहे.
रविवारी, काठमांडूच्या महापौर बालेन शहा यांनी खोऱ्यातील सर्व चित्रपटगृहांना सोमवारपासून तेथे कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले. याबाबत अधिकृत घोषणा करताना त्यांनी एक ट्विटही शेअर केले आहे. यासोबतच यासंबंधीची पत्रेही सर्व चित्रपटगृहांना पाठवण्यात आली.
— Balen Shah (@ShahBalen) June 18, 2023
सीतेच्या जन्मस्थानावरून वाद
हा सगळा वाद चित्रपटात सीतेला भारताची कन्या म्हणण्यावरून झाला आहे. नेपाळ सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप घेतला. सीताजींचा जन्म भारतात नसून नेपाळमधील जनकपूरमध्ये झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सीतेच्या जन्मस्थानाची चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की सीतेचा जन्म नेपाळमध्ये नसून बिहारमधील सीतामढीमध्ये झाला आहे.