ठाकरे गटाच्या मेळाव्यात केले होते विधान
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) काहीतरी वक्तव्य करायचं आणि मग त्यावर आवाज उठवला गेला की अजबगजब विधाने करत सारवासारव करायची हे जणू समीकरणच झाले आहे. काल ठाकरे गटाच्या मेळाव्यात ‘आम्ही महाविकास आघाडीमध्ये जोपर्यंत उद्धवजींची इच्छा आहे तोपर्यंत राहू. ते काही आमच्या हातात नाही. हे राजकारण आहे’, असे स्पष्टच म्हटले होते. मात्र, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रतिक्रियेनंतर आपल्या विधानात त्यांनी सोयीस्कररित्या बदल केला आहे.
अजित पवार म्हणाले, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, आमची आघाडी २५ वर्षे टिकणार आहे. तेव्हा २५ वर्षे टिकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय? प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असं म्हणत पवारांनी राऊतांना शुभेच्छा दिल्या.
तसेच आता संजय राऊतांना उपरती झाल्याने त्यांनी यावर सारवासारव करणारे स्पष्टीकरण दिले. त्यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला राहण्याची इच्छा आहे की नाही, याबाबत संजय राऊत स्वतःच संभ्रमात असावेत, असे चित्र दिसत आहे.
दरम्यान, अजित पवारांनी मविआबद्दल मी थेट उद्धव ठाकरेंनाच विचारेन, असं म्हटल्यामुळे संजय राऊतांच्या स्पष्टीकरणाला अजित पवारांच्या लेखी काही किंमत नसावी, असं दिसून येत आहे.