
सदाभाऊ खोत यांनी उडवली संजय राऊत यांची खिल्ली
इंदापूर: जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत महाविकासआघाडी बरोबर राहू आणि त्यानंतर स्वतःचा भगवा फडकवू असं वक्तव्य उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. राऊत यांच्या या वक्तव्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी, दादा कोंडके यांचा एक चित्रपट होता इच्छा माझी पुरी करा, त्यानंतर दादा कोंडके यांचा इच्छा माझी पुरी करा या चित्रपटाचा पार्ट टू म्हणजे संजय राऊत, असा टोला लगावला, इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयतक्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
तसेच यावेळी देशी दारूची जेवढी किंमत तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या ,अशी मागणी त्यांनी केली आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटरला ७५ रुपये भाव मिळाला पाहिजे तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे आणि हे अवघड नाही. महागाई वगैरे काही वाढत नाही उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.