नुकतेच इयत्ता दहावी-बारावीचे निकाल लागले. या वर्षी अनेक शाळांचे शंभर टक्के निकाल लागले आहेत. कोरोनानंतर खऱ्या अर्थाने यंदाची दहावी-बारावीची जी परीक्षा झाली, ती परीक्षा विद्यार्थांसाठी मोठे आव्हान होते. कारण त्यातून सावरत असताना अभ्यासाचे टेन्शन प्रत्येक विद्यार्थ्यावर होते. असे असताना भरपूर विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काहींना अपयशही आले असेल. अपयश आले असले तरी खचून ज्याण्याचे काही कारण नाही. जीवनात यश आणि अपयश येतच असते. यश आले तरी पुढे जायचे आणि अपयश आले तरी पुढे जायचे, अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. उलट अपयशातून बरेच काही शिकता येते, हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यामुळे जिद्दीने पुढे जावे, असाच सल्ला द्यावासा वाटतो. खरे तर दहावी-बारावी परीक्षेचा टप्पा हा महत्त्वपूर्ण असतो. जीवन बदलाचा हा टप्पा असे त्याचे वर्णन केले तरी ते योग्य आहे. कारण या टप्प्यातून आपण पुढचे अभासक्रम निवडत असतो. शिवाय प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. कुणाला कला, कुणाला वाणिज्य तर कुणाला विज्ञान विषयात गोडी, रुची असते. विषय कोणतेही असो आपण त्या त्या विषयाला कसा न्याय देतो, हे आपल्यावर अवलंबून आहे. असो. अनेकांनी या परीक्षेनंतर आपापल्या आवडीचे विषय निवडले असतीलच. या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची संभ्रमावस्था निर्माण होते. नेमका काय विषय निवडायचा जेणेकरून आपणास पुढे जाता येईल, असा प्रत्येकाच्या मनात विचार आलेला असतो. अशा वेळी मनाची घालमेल होते; परंतु शांतपणे विचार केला पाहिजे. वर म्हटल्याप्रमाणे विषय कोणताही असो आपण त्याला न्याय्य कसा देतो, हे आपल्यावर अवलंबून असते. म्हणजे झोकून देऊन, जिद्द, चिकाटी आणि मेहनत या गोष्टी लक्षात घेऊन पुढे गेले पाहिजे. आपली आवड कशात आहे, हे आधी ठरवले पाहिजे. पालकांनीही अमूकच विषय आपल्या पाल्ल्याने घेतला पाहिजे, असा आग्रह धरता कामा नये, तर त्याचा कल काय आहे, याची त्याला निवड करू दिली पाहिजे. म्हणजेच त्याच्यावर आपला विचार लादता कामा नये. पालक म्हणून त्याचा सांभाळ करणे, शिक्षण देणे, त्याच्या योग्य गरजा पूर्ण करणे एवढेच पालकांच्या हातात असते. शेवटी त्याला त्याचे पुढे जीवन जगावयाचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच अधिक सखोल आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. कारण या टप्प्यामध्ये आपण योग्य निर्णय घेतला नाही, तर आपणावर भरकटण्याची
पाळी आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून सजग झाले पाहिजे. अर्थात सगळ्यांनाच परिस्थिती अनुकूल असतेच असे नाही.
अनेकांना प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागते. कुणाचे आई-वडील शेतात काम करतात, कुणी अल्प पगारावर नोकरी करून घर चालवत असतात. कुणी रिक्षा चालवून, कुणाची आई धुणी-भांडी करीत असेल, तर कुणी काय, कुणी काय आपला कामधंदा करून मुलाबाळांना शिकवत असतात. अशाही परिस्थितीत मुले-मुली जाणीव ठेवून शिक्षण घेतात आणि पुढे जातात. परीक्षांचे निकाल लागल्यानंतर वर्तमानपत्रांतून पुढे ज्या काही यशकथा प्रसिद्ध होतात, त्यावरून कोण कसा पास झाला, याचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते आणि ज्याने विचार केला नाही तोही गांभीर्याने विचार करू लागतो. यासाठीच योग्य विचार करण्याची गरज आहे. नुसतेच विचार करून चालणार नाही, तर त्याला कृतीचीही जोड द्यावी लागेल. म्हणून अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. आपले करिअर आपण कसे घडवू शकतो, यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन करणे आवश्यक असते. सगळ्यात महत्त्वाची आहे ती आवड-निवड. याची आपल्या आवडीनुसार, कुवतीनुसार अभ्यासक्रम निवडला की त्यात गोडी निर्माण होते आणि त्याला न्याय देता येतो. नेमके हेच होत नाही. त्यामुळे मुलांना अपयश येते, नैराश्य येते आणि मग त्यातून नको ते विचार डोक्यात येतात. बरे ज्यांनी परीक्षेत भरपूर अगदी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक मार्क्स मिळवले, पुढे त्यांचे काय होते हेही माहीत पडत नाही. मार्क्स कमी मिळाले, जास्त मिळाले म्हणून मागेच राहील किंवा पुढे जाईल हेही सांगता येत नाही. कमी गुण मिळवणारे पुढे गेलेल्यांमध्ये अनेकजण आहेत. तर जास्त मार्क्स मिळवणारे मागे पडले, असेही होते. म्हणून आवडीनुसार अभ्यासक्रम निवडून योग्य मार्गदर्शन घेऊन पुढे जाणे हाच जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
दैनिक ‘प्रहार’ने विद्यार्थ्यांना दहावीनंतर मोलाचे मार्गदर्शन ठरावे या दृष्टिकोनातून करिअर गाईडच्या माध्यमातून मार्गदर्शन नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन बोधामृत असल्याचे गौरवोद्गार पराग विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी बाळकृष्ण बनेशेठ यांनी या कार्यक्रमादरम्यान काढले असल्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची किती गरज आहे, हे प्रकर्षाने जाणवते.अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम ‘प्रहार’च्या मुंबई कार्यालयात नुकताच झाला. यामध्ये काही विद्यार्थी, पालक आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची उपस्थिती होती, तर दुसरा कार्यक्रम भांडुपच्या पराग विद्यालयात घेण्यात आला. यावेळी करिअर मार्गदर्शक सचिन सिंग यांनीही याबाबतच्या गरजेवर भर दिला. यशस्वी करिअरसाठी आत्मविश्वास महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने तो निर्माण करा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे मार्गदर्शन करताना दिला. परीक्षेत अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी करिअरमध्ये यशस्वी होतातच असे नाही, अशावेळी पालकांनी मुलांशी संवाद साधला तरच योग्य पद्धतीने पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विचार केल्यास त्यांना निश्चितच चांगला मार्ग सापडेल आणि ते आपले जीवन समृद्ध करू शकतील.