my bmc : शौचालये चोकअप, बसायला बाकडे नाहीत अन लाईट-पाणीही गायब
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईनगरी सुंदर दिसावी यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन रस्त्यांची रंगरंगोटी केली. पथदिव्यांच्या खांबांवर आकर्षक रोषणाई केली. जागोजागी फुलदाण्या सजवण्यात आल्या. मात्र महापालिकेच्या शाळा आणि रुग्णालयांमधील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने येथील शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येते.
रोषणाई आणि रंगरंगोटीसाठी कोट्यवधी रुपये उधळणा-या मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतेची वानवा दिसून येते. कांदिवली पश्चिम येथील इराणीवाडी मधील महापालिका शाळेची इमारत चार मजली आहे. मात्र तिस-या आणि चौथ्या मजल्यावरील शौचालये तुंबलेली असल्याने मुलांना दुस-या मजल्यावर जावे लागते. तसेच मुलांना बसायला बाकडे उपलब्ध नसल्याने या मुलांना जमिनीवर चटईवर बसावे लागते. अनेक वर्गखोल्यांमधील वीज गायब असल्याने माजी नगरसेविका लिना पटेल देहेरकर यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले.
याप्रकरणी देहेरकर यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली असून दोन दिवसांत साफसफाई कर्मचारी नेमण्याची मागणी केली आहे. इराणीवाडी येथील पी/एन विभागाच्या शाळेत गणेश नगर येथील हिंदी आणि तमिळ माध्यमाची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेची पाहणी केली असता शाळेतील शौचालयांमध्ये दुर्गंधी आहे. वर्ग खोल्या आणि आवारातील वीज गायब असल्याचे आढळले.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रीक्स या खासगी संस्थेला साफसफाईचे कंत्राट दिल असल्याचे समजते. मात्र या संस्थेकडे अन्य शाळांचेही कंत्राट दिलेले असून त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाहीत. वळणई आणि इराणीवाडी या दोन शाळांसाठी अवघा एकच कर्मचारी साफसफाईसाठी नियुक्त केला आहे.
शाळांची दैनंदिन सफाई, २४ तास सुरक्षितता, विजेची सोय, प्लंबिंग आणि स्थापत्यविषयक कामांची जबाबदारी महापालिकेने खासगी कंत्राटदारांवर सोपविली आहे. त्यासाठी त्यांना प्रतिमहिना लाखो रुपये दिले जातात. परंतु, स्वच्छतेची कामे व्यवस्थित होत नसल्याचा आरोप देहेरकर यांनी केला आहे. अनेक शाळांमध्ये स्वच्छतेची ऐशी-तैशी झाली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला पुन्हा काम देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकातील बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा खर्चही करण्यात येत आहे. मात्र, शहरातील बऱ्याच शाळांमध्ये सोयी-सुविधांची ऐशीतैशी झाली आहे. दिवसातील पाच ते सहा तास शाळेत घालवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य स्वच्छतागृहाच्या दुरवस्थामुळे धोक्यात आले आहे.
महापालिका शाळांमध्ये उत्तम वर्ग खोल्या, खेळण्यासाठी मैदान, इतर सर्व सुविधा आहे. बाहेरून उत्तम दिसणाऱ्या या शाळा इमारतींची खऱ्या अर्थाने ‘बाहर से टामटूम अंदरसे रामजाने’, अशी अवस्था झाली आहे.
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे असूनही नसल्यासारखीच आहेत. दुर्दैवाने ही सत्य परिस्थिती आहे. सर्वत्र घाण, दुर्गंधी, साचलेला कचरा, अशा भयानक वातावरणात चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपला कार्यभाग उरकावा लागतो.
या बोलक्या चित्रामुळे शाळा प्रशासनाला बालकांच्या ‘राइट टू पी’ या अधिकाराचा विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, विशेषत: प्रत्येक शाळेत मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृहे असावे, असा निर्णय शासनाने एस. एन. एन./ १०९९/ (२४०/९९) उमाशि-२ दिनांक २२ डिसेंबर २००० नुसार जारी केला. परंतु, हा शासन निर्णय कागदोपत्रीच राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे.
स्वच्छता आणि आरोग्याचा जवळचा संबंध असल्याने अस्वच्छ स्वच्छतागृहांचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. अस्वच्छतेमुळे युरीन इन्फेक्शन होते. शिवाय बरेच आजारसुद्धा होतात. तसेच काहीजण अस्वच्छ शौचालयात जाण्यास टाळाटाळ करतात. यामुळे लघवी तुंबवून ठेवल्याने याचा किडनीवरदेखील दुष्परिणाम होतो.
दरम्यान, २२ जूनपर्यंत याबाबत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे माजी नगरसेविका लिना पटेल देहेरकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.