२५ जून पूर्वी घरांच्या हस्तांतरणाचा शासनाचा प्रयत्न
महाड : महाड तालुक्याच्या तळीये कोंडाळकर वाडी येथे दि २२ व २३ जुलै २०२१ रोजी दरड कोसळून झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसह गावांतील एकूण ६६ जणांना प्लॉटचे वाटप महाडच्या तत्कालीन प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व नवनियुक्त प्रांताधिकारी बाणापुरे, तत्कालीन तहसीलदार सुरेश काशीद, नूतन तहसीलदार शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यासंदर्भात नवीन घरांच्या अंतर्गत कामांची बाकी असलेली कामे येत्या २५ जूनपूर्वी पूर्ण करून घरांचा ताबा संबंधित दरडग्रस्त नागरिकांना देण्याबाबत शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे यावेळी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी स्पष्ट केले.
२०२१ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती व दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये या गावातील ८८ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तत्कालीन महाविकास आघाडीने शासनाच्या म्हाडा यंत्रणेकडून या ठिकाणी घरांचा प्रस्ताव मंजूर करून तातडीने गावाच्या अन्य ठिकाणी जागा ताब्यात घेऊन बांधकाम सुरू केले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीत्सव गेल्या दोन वर्षापासून घरांच्या कामाबाबत झालेल्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
गेल्या काही दिवसापासून स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील या संदर्भात सातत्यपूर्ण पद्धतीने संबंधित ठेकेदार व यंत्रणेकडे केलेल्या पाठपुराव्याअंती गावात नव्याने उभारण्यात आलेल्या शाळागृह,अंगणवाडी, व्यायाम शाळा, समाज मंदिर आदींची उद्घाटन करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी शासनाकडून तातडीने या ठिकाणी बैठकीचे आयोजन करून ६६ जणांना प्लॉटचे वाटप करण्यात आले. याबाबत समाधान व्यक्त करीत नागरिकांमधून तातडीने गृहप्रवेशासंदर्भात शासनाने युद्ध पातळीवर कामे करावी अशी मागणी केली जात आहे.