बारामती: वरळीत उबाठा गटाचं शिबिर पार पडलं. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं. जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू, असं संजय राऊतांनी म्हटलं. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं आहे. पाहावे तिकडे, भावी मुख्यमंत्री. पण, आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत राहू. हे राजकारण आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजच्या परिस्थितीत तिघे एकत्र आल्याशिवाय भाजपा आणि शिंदे गटाचा मुकाबला करू शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, ‘आमची आघाडी २५ वर्षे टिकणार आहे.’ तेव्हा २५ वर्षे टिकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय.