
हॉटेल मालकाच्या मुलीने केला पतीवर आरोप
पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील 'हॉटेल वैशाली' हे अत्यंत प्रसिद्ध हॉटेल आहे. अनेक पुरस्कारांनी हॉटेल वैशालीला गौरविण्यात आलं आहे. तसंच अनेक सेलिब्रिटी, राजकारणी यांचं हे आवडीचं ठिकाण आहे. मात्र हॉटेल वैशालीविषयी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या हॉटेलच्या मालकाच्या कन्येनेच तसा आरोप आपल्या पतीवर केला आहे.
बंदुकीचा धाक दाखवून आपल्या पतीने त्याची पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच ते स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप या ३४ वर्षीय कन्येने केला आहे. एवढंच नव्हे तर पती आपल्याला लग्नाआधी जबरदस्तीने त्याच्या घरी न्यायचा व दारू आणि ड्रग्स देऊन लैंगिक संबंध ठेवायचा, असा आरोपही फिर्यादी महिलेने केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
सहा महागड्या गाड्या आणि पावणेदोन कोटींचे दागिने पतीच्या नावावर
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, पतीने लग्नाआधी २०१८ मध्ये तक्रारदार महिलेला घोले रोड येथील राहत्या घरी नेले आणि दारु व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. एवढंच नव्हे तर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक आरोपही या महिलेने केला आहे.
महिलेच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या गाड्या पतीने परस्पर विकल्याच पण सध्या असलेल्या दोन महागड्या गाड्या पती आणि त्याचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाय तक्रारदार महिलेचे एक कोटी ७० लाख रुपयांचे दागिने पतीच्याच ताब्यात आहेत.
यांच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणी विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. जून २०१८ पासून आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटल्याने पोलीस या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करत आहेत.